साध्वी प्रज्ञािंसह यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी
   दिनांक :02-May-2019
 
 
भोपाळ: मध्यप्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर यांनी प्रचारादरम्यान बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करीत 72 तासांची प्रचारबंदी लागू केली आली आहे. या प्रचारबंदीनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे त्यांनीही मंदिरात जाऊन पूजा केली आणि भजनही केले.
 
 
 
साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने आजपासून प्रचारबंदी घातली आहे. त्यामुळे त्या आज गुरुवारी भोपाळमधील एका दुर्गा मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी पूजा केल्यानंतर मंदिरात भजन गायले. तसेच, मंदिरात त्यांनी पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण केले.
भोपाळमधून भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बाबरी मशिदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते, तसेच त्याबाबत बोलताना आनंद व्यक्त केला होता. या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
या वादग्रस्त वक्तव्याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून ही बंदी लागू झाली आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नाही.