माझा ‘रोघा’ पिंज-यातून निघून गेला...एका आईची आर्त हाक!

    दिनांक :02-May-2019
आज होता दयानंदचा वाढदिवस, पार्टीही ठरली होती!
लाखांदूर: अत्यंत मनमिळावू आणि संपूर्ण कुटूंबाला घेऊन चालण्याच्या वृत्तीमुळे हवाहवासा वाटणारा दयानंद याच्या जाण्यामुळे शहारे कुटुंबियांवर कमालीचा आघात झाला आहे. दरम्यान दयानंदच्या जाण्याची वार्ता कानी पडताच त्याच्या आईन ‘माझा रोघा पिंज-यातून निघून गेला’ असे म्हणत आपल्या एकुलत्या एक मुलाच्या जाण्याचे दुःख अनावर झालेल्या आईने टाहो फोडला. विशेष म्हणजे दयानंद चा आज 2 मे रोजी वाढदिवस होता आणि मित्रांसोबतच्या वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजनही झाले होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
 
 
 
 
मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 2 मे 1993 ला वडील गमावलेल्या दयानंद ने जबाबदारी आल्यापासून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले. तीन बहिणी, वृद्ध आईवडील आणि पत्नी असा संसार होता. काही दिवसांपूर्वीच तो घरी येऊन गेला. आईला तब्बेतीची काळजी घे, म्हणून सांगून निघलेला दयानंद आज स्वतःच जग सोडून गेला. जिल्हा बदली करुन घे, असे नेहमी मी सांगत होते. परंतु ते झाले नाही. दर महिन्याला न चूकता औषधाची व्यवस्था करुन ठेवणारा दयानंद गेला. मला त्याच्या खांद्यावर जायचे होते, पण् त्यालाच खांद्यावर घेऊन निरोप घेण्याची वेळ आली, असे सांगताना आईचे हृदय गहिवरुण आले होते.
आज 2 मे ला त्याचा वाढदिवस होता. सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर आज एका हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करुन ठेवले होते, अशी माहिती दयानंदची बहिण छबीला हिने 'तरुण भारत'ला दिली. आज वाढदिवसाची पार्टी अर्धवट राहिली, मात्र आपल्या लाडक्या भावाला निरोप देण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढविल्याचे सांगताना तिला अश्रू आवरले नाहीत.