कलाकारांना आदर्श बनवू नका, नवाजुद्दीनचा सल्ला
   दिनांक :02-May-2019
‘गॅंग ऑफ वासेपूर’, ‘बदलापूर’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘मंटो’ या चित्रपटांतून बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे नवाजूद्दीन सिद्दीकी. तसेच या चित्रपटांतील भूमिकेसाठी नवाजुद्दीनला पुरस्कारही मिळाले. त्यानंतर नवाजुद्दीन नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटादरम्यान नवाजुद्दीनला ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलचे नवाजुद्दीनने सडेतोड उत्तर दिले आहे.
 
 
अभिनेता अरबाज खानच्या ‘पिन्च बाय अरबाज’ या शोमध्ये नवाजुद्दीनला पाहूणा म्हणून बोलवण्यात आले होते. या शोमध्ये नवाजुद्दीने त्याला ‘ठाकरे’ चित्रपटादरम्यान सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलवर उघडपणे चर्चा केली आहे. ‘मी एक अभिनेता आहे आणि मी सर्व प्रकारची भूमिका साकारणार. अनेक सुशिक्षित लोकांनी मी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका का साकरली यावर प्रश्न केला. मी त्यांना कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही कारण ते तितके हुशार आहेत. परंतु ज्यांना माझी भूमिका पटलेली नाही त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज आहे का? माझ्या काही मित्रांनी देखील माझ्या या भूमिकेवर प्रश्न विचारले आणि त्यांना मी एकच उत्तर दिले की मी एक अभिनेता आहे. मला जी भूमिका मिळेल तिला मी माझ्या परिने न्याय देईन. तुम्ही जर मी साकारलेल्या भूमिकांवरून माझ्याबद्दल मत तयार करत असाल तर मी गणेश गायतोंडे ही भूमिकासुद्धा साकारली आहे आणि ही तर सर्वांत विचित्र भूमिका होती’ असे नवाजुद्दीन म्हणाला.
‘मी काही विचित्र भूमिका सहजतेने पार पाडतो. मला सर्व प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात. आज मला संधी मिळाली तर मी त्या संधीचा फायदा घेणार. मला असे वाटते की प्रेक्षकांनी या भूमिका चित्रपट गृहांपूरताच मर्यांदित ठेवाव्यात. प्रेक्षकांनी अभिनेत्यांना फक्त मनोरंजनासाठी ठेवावे. त्यांना आदर्श बनवू नये’ असे नवाजुद्दीन पुढे म्हणाला.