सर्जिकल स्ट्राईकचा वापर मतांसाठी केला नाही
   दिनांक :02-May-2019
 नवी दिल्ली: संपुआ सरकारच्या दोन्ही कारकीर्दीत सहा वेळा सीमापार सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, पण आम्ही त्याचा वापर कधीच मतांसाठी केला नव्हता. नरेंद्र मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले आणि आपले अपयश लपविण्यासाठी भाजपाने सर्जिकल स्ट्राईकला प्रचाराला मुद्दा बनविला आहे, अशी टीका कॉंगे्रसने आज गुरुवारी केली.
दरम्यान, लष्काराने मात्र संपुआ काळात सर्जिकल स्ट्राईक्स झाल्याचे नाकारले आहे. एका माहिती अधिकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना लष्कराने हे स्पष्टीकरण दिले होते.
 

 
 
 
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग म्हणाले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संपुआ सरकार पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हते, या आरोपाशी मी सहमत नाही. प्रत्येक स्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता. दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही दबाव आणण्याची भूमिका आम्ही घेतली होती. आम्हाला यात यश मिळाले होते. मुंबई हल्ल्यानंतर 14 दिवसांच्या आत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदला जागतिक दहशतवादी घोषित कऱण्यात आले. आमच्याच सरकारच्या काळात त्याच्यावर अमेरिकेने 10 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. फरक इतकाच की, आम्ही या गोष्टी कधीच जाहीर केल्या नाही. मुंबई हल्ल्यानंतर आमच्या सरकारने सागरी सुरक्षा मजबूत केली आणि राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राची संकल्पना मांडली, पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यास विरोध केला होता, असा दावाही मनमोहनसिंग यांनी केला.
सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक
संपुआ सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केले असल्याचा दावा करीत कॉंग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी याच्या तारखाही दिल्या. पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनिंसग यांनी कधीच िंदडोरा पिटला नाही; मात्र आताचे सरकार गाजावाजा करीत आहे, असे शुक्ला यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील भट्टल सेक्टरमध्ये 19 जून 2008 रोजी सर्वप्रथम सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. नीलम नदीच्या खोर्‍यात शारदा सेक्टरमध्ये 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2011 रोजी दुसरा, 6 जानेवारी 2013 रोजी सावन पात्र चेकपोस्ट येथे तिसरा, नजापीर येथे 27 व 28 जुलै 2013 रोजी चौथा, 6 ऑगस्ट 2013 रोजी पाचवा आणि 14 जानेवारी 2014 रोजी सहावा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातही दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. नीलम नदीच्या पलीकडे असलेल्या नाडला एन्क्लेव्ह भागात 21 जानेवारी 2000 रोजी पहिला व 18 सप्टेंबर 2003 रोजी पुंछ जिल्ह्यातील बारोह येथे दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, असे शुक्ला म्हणाले.