मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
   दिनांक :02-May-2019
- मोदी सरकारच्या कूटनीतीचा मोठा विजय
- चीनही नरमला, पाकिस्तानही तोंडघशी
संयुक्त राष्ट्रे,
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बुधवारी अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले. भारताच्या कूटनीतीचा हा सर्वांत मोठा विजय असून, या कूटनीतीपुढे चीनलाही गुडघे टेकावे लागले आहे, तर दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे.
 
 
 
भारताने सादर केलेल्या सुधारित पुराव्यांनी आमचे समाधान झाले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कोणताही निर्णय निष्पक्ष असावा व तो पूर्वग्रहदूषित नसावा, हीच चीनची भूमिका होती. ठोस पुरावे व सर्व सहभागी पक्षांचे एकमत, या आधारावरच आम्ही आपल्या भूमिकेत बदल केला आहे, असे चीनने स्पष्ट केले, तर अझहरवरील निर्बंधांची तातडीने अंमलबजावणी करू, अशी ग्वाही पाकिस्तानने दिली आहे.
 
चीन अझहरच्या मुद्यावर कुणाचेच ऐकत नसल्याचे पाहून भारतासोबतच अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन एकत्र आले आणि या देशांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले. चीनला माघार घ्यावी लागली आहे. बुधवारी झालेल्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या बैठकीत चीनने आपली बाजू मांडली आणि त्यानंतर काही वेळातच अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली.
चीनची भूमिका
अझहरच्या मुद्यावरून चीन सातत्याने संबंधित पक्षांशी चर्चा करीत होता. यावर सर्वसहमतीने निर्णय व्हावा व निष्पक्ष न्यायदान व्हावे, हीच चीनची भूमिका होती. भारताने नव्याने जे पुरावे सादर केले, त्यावर आमचे परिपूर्ण समाधान झाले आहे, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले.
 
भारताची भूमिका
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी चीनचा विरोध मावळण्यामागील कारण स्पष्ट केले. भारताने चीनला मसूद अझहरविरोधात सबळ पुरावे सादर केले. भारतातील त्याच्या दहशतवादी कारवायांची माहिती ठोस पुरावे आणि कागदपत्रांसह चीनला दिली. त्यावर समाधानी होऊन चीनने आपला विरोध मागे घेतला आणि मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पािंठबा दिला, असे रवीशकुमार यांनी सांगितले.