वंचित आघाडीला दोन जागा मिळणार : प्रकाश आंबेडकर

    दिनांक :02-May-2019
 
 
मुंबई: कॉंग्रेसने उत्तरप्रदेश, राजस्थान आणि राज्यातही आमच्यासारख्या पक्षांसोबत जुळवून घेतले नाही. यामुळे त्याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसणार आहे, तर मोदींच्या विरोधातील नाराजीमुळे त्यांनाही सत्ता स्थापन करता येणार नाही, यामुळे देशात प्रादेशिक पक्षांचाच बोलबाला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर असेल, असे भाकित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळतील, असेही ते म्हणाले.
 

 
 
प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी देशात नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांना सत्ता स्थापन करणे तितके सोपे नसल्याचे सांगत आपल्या पक्षालाही केवळ दोन जागा मिळतील, असा खुलासा केला.
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्याचा निषेध करीत त्यांनी नक्षल्यांसोबत चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे, अशी सूचना केली. यापूर्वी माजी पंतप्रधान नरिंसहराव यांनी तसा प्रयत्न केला होता. त्यानंतर बरेच समाधानकारक विषय समोर आले होते. यामुळे चर्चा होणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूने बंदुका, हल्ले करणे, यातून हा प्रश्न सुटणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
राज्यात वर्षेभरापूर्वी जन्माला आलेल्या आमच्या वंचित बहुजन आघाडीला काही जण, ही आघाडी म्हणजे दलित-मुस्लिम आघाडी, असे संबोधतात, पण ते चुकीचे आहे. आमची आघाडी धनगर, ओबीसी, भटके विमुक्त आदी वंचित घटकांची आहे. त्यांच्या न्यायाची आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची लोकसंख्या आहे, त्यामुळे या पट्‌ट्यात आम्ही या समाजाला सर्वाधिक जागा दिल्या होत्या. ज्या समाजाला कधी संधी मिळाली नाही, अशा समाजाला आम्ही संधी दिली.
राज्यात कॉंग्रेसला आपल्या आघाडीमुळे किती फटका बसेल, याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी यासाठी निकालाच्या तारखेनंतर समोर चित्र येईल, असे सांगत नेमके उत्तर देण्याचे टाळले. तर आपल्या आघाडीमुळे भाजपाला फायदा होणार असल्याचे बोलले जात असून, त्याविषयी नेमकी काय वस्तुस्थिती आहे, याविषयीही विचारले असता त्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले.