कुरखेडा स्फोटात मेहकरचे राजू गायकवाड शहीद

    दिनांक :02-May-2019
मेहकर : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्याजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भुसुरूंग स्फोटात मेहकर येथील जवान राजु नारायण गायकवाड (वय ३३) हे शहीद झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरावर शोककळा पसरली आहे.
स्थानिक अण्णाभाऊ साठे नगर मधील रहिवासी राजु नारायण गायकवाड हे २०११ मध्ये पोलीस दलामध्ये भरती झाले होते. घरची परिस्थिती अतिशय बिकट असतांना स्वतः च्या मेहनतीने राजु हे पोलीस दलामध्ये सहभागी झाले होते. काल १ वाजता निधनाचे वृत्त कळताच गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजु यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी भारती, मुलगी गायञी वय ५ वर्षे, मुलगा समर्थ वय ८ महिने असा परिवार असून पत्नी व दोन मुले राजु सोबत गडचिरोली येथे होते. राजु शहीद झाल्याचे वृत्त मेहकर पोलीसांनी दिल्यानंतर कालच राजु यांचे आई-वडील गडचिरोलीकडे रवाना झाले. दरम्यान आज दुपारी १२ वा शहीद झालेल्या जवानांना गडचिरोली येथे मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव मुळगावी रवाना होणार असल्याचे वृत्त आहे.
दोन वर्षांपूर्वी शहीद राजुचा मोठा भाऊ युवराज यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी राजु
यांच्या खांद्यावर होती.गायकवाड कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्याने म्हाताऱ्या आई-वडीलांवर संपूर्ण जबाबदारी आली आहे.