सुसंस्कृत मुलांनी प्रियांकापासून लांब राहावे
   दिनांक :02-May-2019
स्मृती इराणी यांचा इशारा
नवी दिल्ली: देशाचा चौकीदार चोर आहे, असे लहान मुला-मुलींच्या तोंडून सातत्याने वदवून घेणार्‍या कॉंगे्रसच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली. सुसंस्कृत घरातील मुलांनी प्रियांका वढेरांपासून दूरच राहायला हवे, अशी भूमिका स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.
प्रियांका यांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत काही लहान मुले व मुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरत घोषणा देत आहेत. या व्हिडीओत प्रियंका गांधी लहान मुलांच्या मनावर वाईट सवयी बिंबवत आहेत आणि त्यांना वाईट वागण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत; त्यावरून त्यांची विचारसरणी दिसून येते, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.
 

 
 
प्रचाराच्या घोषणा देण्यासाठी तुम्ही लहान मुलांना कसे प्रोत्साहित करता, प्रियांका वढेरा यांनीच पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द वापरण्यास मुलांना सांगितले. कुणी शिकविल्याशिवाय लहान मुले असे बोलतील काय, असा प्रश्नही स्मृती इराणी यांनी उपस्थित केला.
दरम्यान हा व्हिडीओ अर्धवट पसरवला जात आहे. प्रत्यक्षात मुलांनी जेव्हा पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द वापरत घोषणा दिल्या, तेव्हा मी त्यांना रोखले होते, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.