मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा धावणार व्हिक्टोरिया !

    दिनांक :02-May-2019
 
मुंबई :  जुन्या मुंबईची शान असलेली परंतु आता इतिहास जमा झालेली व्हिक्टोरिया घोडागाडी पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत धावताना दिसणार आहे. मात्र, आता ही व्हिक्टोरिया गाडी घोड्यांशिवाय असून बॅटरीवर ही गाडी धावणार आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यावर या नव्या व्हिक्टोरियाला मंजुरी मिळणार असल्याची माहिती आहे.

 
 
 
पर्यटकांचे आकर्षण असणारी व्हिक्टोरिया गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉईंट आणि गिरगाव चौपाटी या मार्गांवर धावणार असल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. व्हिक्टोरिया आणखी काही मार्गांवर चालवण्याबाबत विचार सुरू असून वाहतूक पोलिसांशी याबाबत चर्चा सुरू आहे. अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. जुनी व्हिक्टोरिया चालवणाऱ्या चालकांना ही नवी गाडी चालवण्याचा परवाना देणार असल्याचेही  संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
चार वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया घोडागाडी चालवण्यास हायकोर्टाने बंदी आणली होती. त्यावेळी या व्हिक्टोरिया चालकांच्या पुनर्वसनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. त्यावेळी घोडागाडीच्या मालकांना ३ लाख व चालकांना एक लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि दक्षिण मुंबईत फेरीवाला व्यवसायाचे परवाना देण्याचे ठरले होते. मात्र, ९१ मालक आणि १३० चालकांपैकी बऱ्याचजणांचे पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे अशांनाच याचा परवाना देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.