...तर इराणला नेस्तनाबूत करू

    दिनांक :20-May-2019
- डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
वॉशिंग्टन,
इस्लामिक प्रजासत्ताक असलेल्या इराणने अमेरिकन हितांवर हल्ला करायचा प्रयत्न केल्यास, आम्ही या देशाला नेस्तनाबूत करू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

 
 
इराणला लढायची इच्छा असेल, तर तो इराणचा अधिकृत अंतच ठरेल. परत, अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा त्यांनी टि्‌वटवर दिला आहे. अमेरिकेने आखातामध्ये बी-52 बॉम्बर्स तैनात केल्याने इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. अमेरिकेने तैनात केलेल्या बी-52 बॉम्बर्समुळे आपल्याला धोका निर्माण झाला आहे, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने कट्टर शत्रू असलेल्या इराणवर किती दबाव निर्माण करावा याबाबत ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत अमेरिका इराणबाबत संमिश्र देत आहे.
 
 
 
इराकमधील सशस्त्र गटांचा पािंठबा इराणला मिळत असल्याने अमेरिकेने या क्षेत्रात लढाऊ विमानवाहू जहाजे आणि बी-52 बॉम्बर्स तैनात केली आहेत, तसेच गरज नसलेल्या राजनयिक कर्मचार्‍यांना इराक सोडून जाण्याचे आदेशही ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचे इराणबाबत कठोर भूमिका घेण्याचे मत असले, तरी ट्रम्प प्रशासनातील इतर नेत्यांचा मात्र या भूमिकेला विरोध आहे.