आधारचा तीन वर्षे वापर न केल्यास होणार ‘डिॲक्टिव्हेट!’

    दिनांक :20-May-2019
विजय सरोदे
देशातील जवळपास सर्वच नागरिकांना आधार कार्डांचे वाटप करण्यात आलेले आहे. आता अगदी थोडे अपवादच उरलेले असतील. ते सोडून इतर लोकांनी त्यांच्या आधार कार्डाचा नेहमीच वापर करणे आवश्यक आहे. नव्हे त्याची गरज प्रत्येक ठिकाणी भासत असतेच. अगदी न्यायालयाने त्याच्याविरोधात निर्णय देऊनही सरकारी पातळीवर मात्र त्याची गरज भासत असतेच. ते एक प्रकारचे ओळखपत्र समजले जाते. तसेच त्याच्यावरील क्रमांक(आधार क्रमांक) हा अत्यंत महत्त्वाचा असतो.
 
बँकांमध्ये खाते उघडतांनाही ते लागत असते. एवढेच नव्हे आयकर विभागाच्या पॅन कार्डाचीही त्याच्याशी जोडणी करावी लागते. त्याशिवाय इन्कमटॅक्स रिटर्न भरता येत नाही. त्यामुळे ते सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. तसेच ते नुसतेच कपाटात ठेवून न देता त्याचा वापरही केला पाहिजे. पण काही जणांनी अजूनही त्याचा वापर केलेला नसल्याचे आढळून आले आहे. म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा (युआयडीएआय)ने स्पष्ट केले आहे की जर कोणी त्याचा सतत तीन वर्षांपर्यंत वापर केलेला नसेल तर ते डिऍक्टिव्हेट होणार आहे, म्हणजेच ते बंद पडणार आहे. त्यामुळे त्याचा वापर चालू ठेवणे आवश्यक आहे. 
 
 
 
सर्वात पहिले म्हणजे आपल्या आधार कार्डाची बँक खात्याशी जोडणी ( लिंकिंग ) करावी. अशा रीतिने आधार कार्ड पॅनशी लिंकिंग झाल्यास ते डिऍक्टिव्हेट होण्याची शक्यता संपून जाईल. याचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच निवृत्ती वेतन (पेन्शन), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)चा तपशील भरणे यासह अनेक कामांसाठी होत असतो.
  
जर आपल्या आधार कार्डाची स्थिती (स्टेट्स) जाणून घ्यावयाची असेल तर युआयडीएआयच्या बेबसाईटवर जाऊन आधार सेवेच्या ऑप्शनला सिलेक्ट करावे, त्यावर आपणास व्हेरिफाय आधार नंबरवर जाऊन आपला आधार नंबर टाईप करावा. आपला आधार नंबर टाकताच त्याच्या समोर लाल किंवा हिरव्या रंगाची खूण दिसेल. हिरवा रंग म्हणजे आधार कार्ड ऍक्टिव्हेट आहे व लाल रंग म्हणजे ते डिऍक्टिव्हेट आहे असा अर्थ असतो.
 
जर आपणास आपले आधार कार्ड रिऍक्टिव्हेट करायचे असेल तर त्यासाठी आपणास आधार कार्ड तयार करतांना दिलेली कागदपत्रे पुन्हा एकत्र करावी लागतील. ही सर्व कागदपत्रे घेऊन आधार नोंदणी केंद्रात जावे लागेल. तिथे जाऊन आधार अपडेटचा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानंतर पुन्हा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतरच आधार कार्ड अॅक्टिव्हेट होईल. या सर्वांसाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागते. या सर्व कटकटींपेक्षा आधार कार्डाचा वापर तीन वर्षांत केव्हा ना केव्हा सरकारी योजनांमध्ये केला पाहिजे. नाहीतर त्याला बँक खात्याशी तरी जोडून घेतले पाहिजे.
 
4-जी नेटवर्कमध्ये भारत जगातील पाचव्या स्थानावर आलेला आहे. रिलायन्स जीओच्या नेटवर्कमुळे भारतातील 4जी नेटवर्क वेगाने वाढू लागलेले आहे. आता प्रत्येक शहरात 80 टक्क्यांपेक्षाही जास्त 4 जी नेटवर्क उपलब्ध झालेले आहे. त्याचबरोबर ग्राहकांना प्रतिसेकंद 7 मेगाबाईट (7 एमबीपीएस) इतका वेग मिळतो आहे. गेल्या नऊ महिन्यांत 60 हजारपेक्षा जास्त 4-जी टॉवर्स उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना 4-जीचा सुखद अनुभव येत असून आगामी काळात 4-जीचा वेगही वाढणार आहे.
 
फळे-भाज्यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यात राज्यांचा अन्न विभाग व जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहेत. इतकेच नव्हे काही फळे उदाहरणार्थ आंबा, केळी, आदी कृत्रिमरित्या पिकविली जात असल्याने त्यांची मूळ चव बिघडत चाललेली आहे. पण याकडे सरकारी यंत्रणा डोळ्यावर कातडे ओढून आहेत. ही फळे कॅल्शियम कार्बाईड या रसायनाने पिकविली जात आहेत. वस्तुत: अन्ननियामक एफएसएसएआयने कॅल्शियम कार्बाईडवर बंदी घातलेली आहे. तरीही त्याचा वापर वाढतच आहे. पण या वापराला सरकारी प्रशासन आळा घालू शकलेले नाही. फळे आणि भाज्याच काय, अगदी दूध व किराणा सामानातही सर्रास भेसळ होत आहे. दुधात 13 टक्के पाणी मिसळले जात असते. खाद्य तेलांमध्येही अशीच भेसळ आढळते.
 
यावर केवळ नावापुरती कारवाई करून कागदपत्रे रंगविण्यात सरकारी यंत्रणा धन्यता मानत आहे. पण हा जनतेच्या आरोग्याशी होणारा खेळ कोण थांबविणार? हा कळीचा प्रश्नच आहे.
 
(लेखक जळगाव तरुण भारतचे अर्थविषयक स्तंभलेखक आहेत)