ऐश्वर्याचा व्हायरल फोटो ट्वीट करून विवेक गोत्यात

    दिनांक :20-May-2019
मुंबई,
लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा रविवारी संपताच एक्झिट पोलनी एकच धमाका उडवून दिला. एक्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गंमतीशीरपणे सांगणारे ऐश्वर्या रायचे छायाचित्र खूप व्हायरल झाले आहे. तिचे आधीचे बॉयफ्रेंड म्हणजे 'एक्झिट पोल' आणि पती अभिषेक म्हणजे 'प्रत्यक्ष निकाल' असं म्हणणारं हे छायाचित्र चक्क तिचा आधीचा बॉयफ्रेंड विवेक ओबेरायनेही ट्वीट केलं आहे! या ट्विटनंतर विवेक ओबेरॉय चांगलाच गोत्यात आला आहे. या ट्वीटमुळे तो ट्विपलर्सकडून चांगलाच ट्रोल झाला. शिवाय या ट्वीटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. लवकरच विवेकला नोटीस बजावण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने विवेकला नोटीस बजावली असून त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
 
 
ऐश्वर्याचं सलमान, विवेकसोबत लग्न होणं हे केवळ अंदाज होते, ते चुकले असं म्हणणारं हे छायाचित्र विवेक ओबेरायनेही ट्वीट केलं आणि लिहिलंय, 'हाहा, क्रिएटिव्ह! येथे राजकारण नको...आयुष्य असं असतं.' पण महिला आयोगाने मात्र यासाठी विवेकवर ताशेरे ओढलेत. विवेक ओबेरॉयचे ट्वीट हे महिलेचा अनादर करणारे आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटले आहे. त्याला यासाठी नोटीस बजावण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
एक्झिट पोल्सनी 'फिर एक बार, मोदी सरकार' चा नारा दिल्याने एक्झिट पोलबाबतच उलटसुलट मतं व्यक्त होऊ लागली आहेत. त्यातच २००४, २००९ च्या लोकसभांच्या वेळी एक्झिट पोल्सचे अंदाज सपशेल चुकले होते. निवडणुकीच्या निकालाच्या आधीचा एक्झिट पोल आणि निवडणूक जाहीर होताच येणारा ओपिनिअन पोल म्हणजे प्रत्यक्ष निकाल नव्हे हे सांगणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या व्हायरल छायाचित्रात तिचे तीन फोटो आहेत. पहिला सलमान खानसोबतचा, यावर लिहिलंय ओपिनिअन पोल, दुसऱ्या विवेक ओबेरॉयसोबतच्या छायाचित्रावर लिहिलंय एक्झिट पोल आणि तिसऱ्या अभिषेक, आराध्यासोबतच्या फोटोवर लिहिलंय रिझल्ट.