पोर्णिमेच्या प्रकाशात प्रगणकांना दिसले आवडते वन्यप्राणी

    दिनांक :20-May-2019
अविस्मरणीय अनुभव
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मचाणावरील प्रगणना
 
१६ वाघ,३३ बिबट,२३८ अस्वलं व १०७४ रानडुकरं आढळल्याची नोंद
अकोट: वैशाख पोर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात शनिवार (ता,१८) ला मेळघाटातील वन्यजीव प्रगणनेदरम्यान वाघ,बिबट,अस्वल आदी वन्यप्राण्यांना मचाणावर बसून प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य वन्यजीव प्रेमींना लाभले.या वर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्रामुख्याने १६ वाघ ३३ बिबट व २३८ अस्वलं आढळल्याची नोंद करण्यात आली.या प्रगणनेत सुमारे ४११ निसर्गप्रेमी प्रगणकांनी सहभाग घेतला.या प्रगणनेदरम्यान आढळलेल्या रानडुकरांची संख्या विक्रमी असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 
 
या प्रगणनेत अकोट वन्यजीव विभागातील धारगड व सोनाळा वनपरिक्षेत्रात रात्री व वान वनपरिक्षेत्रात दिवसाला वाघोबांचे प्रत्यक्ष दर्शन प्रगणकांना झाल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल वाकोडे यांनी दिली.तर वान वनपरिक्षेत्रात प्रगणकांना दिवसा एक अस्वल पाणवठ्यावर पाणी पितांना दिसले.धारगड वनपरिक्षेत्रात दिवसा प्रगणकांनी रानगवा,सांबर व चितळांचा कळप प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटला.मेळघाटात सर्वाधिक वाढ जर कोणत्या वन्यप्राण्याची झाली असेल तर ती रानडुकरांची आहे.२०१८ मधील प्रगणनेत आढळलेल्या रानडुकरांची संख्या केवळ १६२ होती.तर २०१९ च्या प्रगणनेत ती एक हजार ७४ अशी प्रचंड झाल्याने आश्चर्यचकित होण्याची वेळ आली आहे.
 
 
या प्रगणनेच्या नोंदीनुसार,मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ४४६ मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती.आँनलाईन पध्दतीने प्रगणकांची निवड करण्यात आली.त्यात ४११ प्रगणकांनी प्रगणना पुर्ण करुन वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या.त्यानुसार १६ वाघ व ३३ बिबट आढळले.गत वर्षी २०१८ मध्ये वाघांची संख्या १६ च होती.परंतू तेव्हा बिबट १२ आढळल्याने या वर्षी बिबट्यांची संख्या तब्बल २१ नी वाढल्याचे आढळल्याने वनाधिकारी सुध्दा विस्मयचकित झाले आहेत.मेळघाटात अस्वलं गतवर्षी १६३ व यावर्षी २३८ आढळल्याने अस्वलांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.आता हिच अस्वलं गावांलगतच्या केळीच्या बागांमध्ये दिसून येत आहेत.माकडांची वाढलेली संख्याही चकित करणारी आहे.गतवर्षी आढळलेल्या माकडांची संख्या १५२ वरुन ९८४ वर पोहोचली आहे.सांबरांची संख्याही ३३७ वरुन ६६८ वर पोहोचली आहे.तर चितळांची संख्या १२८ वरुन ३२५ वर पोहोचली आहे.विशेष असे की गत वर्षी केवळ एक तडस प्राणी आढळल्याची नोंद होती.तर या वर्षी ३१ तडस प्रगणकांच्या पाहण्यात आले आहेत.निलगायींची संख्या ६० वरुन ४१९ वर पोहोचली आहे.तर भेकरांची(बार्किंग डीअर) संख्या १४३ वरुन २८६ झाली आहे.रानगव्यांची संख्या २०९ वरुन ५६४ झाली आहे.तसेच चौसिंगाची संख्या २८ वरुन ३९ झाली आहे.सायाळची संख्या ११ वरुन ४५ झाली आहे.विशेष असे की,गतवर्षी अजिबात न दिसलेली ठिपक्यांची मांजर या वर्षी ७९ च्या संख्येत दिसल्याने हा सध्या मेळघाटात कौतुकाचा विषय झाला आहे.खवल्या मांजर गतवर्षी एक तर या वर्षी दोन आढळले आहेत.चांदी अस्वलांची संख्या दोन वरुन १८ झाली आहे.रानकुत्र्यांची संख्या ४७ वरुन १३२ वर पोहोचली आहे.

 
 
ही प्रगणना नागपूर येथील वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर,अमरावती विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी,अकोट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक टी.बेऊला,गुगामलचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार,सिपनाच्या डॉ.शिवबाला,मेळघाट प्रादेशिकच्या उपवनसंरक्षक पियुषा जगताप,अकोला वन्यजीवचे उपवनसंरक्षक श्रखैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.