भारतीय महिलांची विजयी सलामी

    दिनांक :20-May-2019
- दक्षिण कोरियावर 2-1 ने विजय
जिन्चेऑन,
भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरिया दौर्‍याची आत्मविश्वासपूर्वक सुरुवात करत विजयी सलामी दिली. तीन सामन्यांच्या द्विराष्ट्र हॉकी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियावर 2-1 असा रोमांचक विजय नोंदविला. 
 
 
युवा आक्रमक खेळाडू लालरेमसियामी (20 वे मिनिट) व नवनीत कौरने (40 वे मिनिट) भारतासाठी प्रत्येकी एक गोल नोंदविला, तर यजमान दक्षिण कोरियासाठी शिन हायजिआँगने एकमेव गोल नोंदविला.
स्पेन आणि मलेशियात प्रभावी प्रदर्शन केल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने यजमान संघाविरुद्ध दमदार सुरुवात केली. पहिल्या चरणाच्या प्रारंभी पेनॉल्टी कॉर्नरची संधी गमावल्यानंतर 20 व्या मिनिटाला भारताच्या लालरेमसियामीने जबरदस्त मैदानी गोल नोंदविला. त्यानंतर पाहुण्या संघाच्या नवनीत कौरने आक‘मक खेळ करत दुसरा गोल नोंदवून आघाडी वाढविली.
 
या सामन्यादरम्यान यजमान संघाला 5 पेनॉल्टी कॉर्नरची संधी मिळाली, मात्र 48 व्या मिनिटाला मिळालेल्या या एकमेव पेनॉल्टी कॉर्नरला ते गोलमध्ये परावर्तित करू शकले. शिन हायजिआँगने हा गोल केला. भारताची अनुभवी गोलरक्षक सविता हिने कौतुकास्पदरीतिने गोल वाचविले आणि आपल्या संघाची आघाडी कायम राखण्यास मदत केली.
 
हा पहिला सामना होता. निकाल चांगला लागला, परंतु संघाला अधिक उत्तम प्रदर्शन करता आले असते. या सामन्यात आम्ही काही नवीन करण्याच्या प्रयत्नात होतो, मात्र आमचा संघ हा बदल कसा हाताळतो, हे बघणे उत्सुकतेचे ठरले, असे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक जोएर्ड मारिने म्हणाले. आता पुढील सामन्यात नवीन तंत्रकौशल्य आणि वेगवान खेळ करण्यावर आमचा भर राहील, असेही ते म्हणाले. भारताचा दुसरा सामना बुधवारी होणार आहे.