वाशीम : मान्सून पूर्व तयारीची जिल्हा अधिकाऱ्यांची आढावा बैठक

    दिनांक :20-May-2019
 
आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी मोडक
 वाशीम: आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून सदर आपत्तीचे निवारण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारिया, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, अनुप खांडे यांच्यासह सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व शोध आणि बचाव कार्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

 
 
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले की, जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. त्यामुळे आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळता येईल. सर्व तहसीलदार कार्यालये, पोलिस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याची कार्यवाही 1 जून पर्यंत पूर्ण करून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा. सर्व नियंत्रण कक्षा नियमितपणे कार्यरत राहणे आवश्यक असून त्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. नियंत्रण कक्ष बंद असल्याचे आढळ्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
सर्व तहसीलदारांनी पोहणार्‍या व्यक्तींची तालुकानिहाय माहिती संकलित करावी. आरोग्य विभागाने सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधी साठा उपलब्ध ठेवावा. तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रनियं साथरोग नियंत्रण पथक तयार ठेवावे. नगरपरिषदेने शहरातील नाले सफाई व दुरुस्तीचे काम 30 मे पूर्वी पूर्ण करावे. शहरातील धोकादायक इमारती, झाडे यांच्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. घनकचर्‍यामुळे नाले तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी यावेळी दिल्या.