रणवीर सिंह गाणार

    दिनांक :20-May-2019
मुंबई :
अभिनेता रणवीर सिंगचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी तो प्रत्येक वेळी काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असतो. रणवीरच्या 'गली बॉय'नंतर तो पुन्हा एकदा चित्रपटात गाणं गाताना दिसणार आहे. आगामी '८३' चित्रपटात तो गाणार असल्याची चर्चा आहे.
 
 
रणवीरनं 'गली बॉय' चित्रपटात त्याच्या आवाजात 'रॅप साँग' रेकॉर्ड केले होते. त्याच्या चाहत्यांना ते प्रचंड आवडले, सोशल मीडियावरही ते व्हायरल झाले. त्यामुळे, रणवीर सिंग पुन्हा एकदा गाणं गाणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '८३' चित्रपटला संगीत देणारे संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी रणवीरला पुन्हा गाण्यासाठी तयार केलं आहे. चित्रपटातील एक गाणं रणवीरच्या आवाजात असावं याविषयी ते निर्मात्यांशी बोललेदेखील आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीदेखील याला हिरवा कंदिल दाखवलाय.
१९८३ साली टीम इंडियानं जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार असून अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटात भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका करताना दिसणार आहे. रणवीरसोबत पंकज त्रिपाठी, हार्डी संधू, एमी विर्क, जीवा, साकिब सलेम, ताहिर राज भसीन, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील हे कलाकारही '८३'चा भाग असणार आहेत.