मेळघाटात अग्नितांडव ; ७० घरे व ३० गोठ्यांची राखरांगोळी

    दिनांक :21-May-2019
मेळघाटातील भुलोरी गावात आगीचे तांडव
४ बैल, १५ बकर्‍यांचा मृत्यू
 
 
धारणी: मेळघाट अंतर्गत येणार्‍या धारणी तालुक्यातील भुलोरी गावामध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास भिषण आग लागल्यामुळे जवळपास ७० घरे व ३० गोठे जळून खाक झाले आहे. घरातील जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झाले असून गोठ्यातील जनावरांचा चार व शेती उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे. या हाहाकार माजला आहे. संध्याकाळी आग नियंत्रणात आली.
 
 
 
 
धारणीपासून १५ किलोमिटर दूर असलेल्या भुलोरी गावामध्ये दुपारी २ वाजताच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये स्पार्किंग होऊन एका घरावर आगीचे गोळे पडल्यामुळे त्याला घराला आग लागली. पाहता-पाहता आगीने विक्राळरूप धारण केले व बाजुच्या घराला आपल्या कवेत घेतले. तेथील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आजुबाजुच्या घरांना आगीने वेढा घातला. एकानंतर एक असे चार घरातल्या सिलेंडरचे स्फोट झाले. त्यामुळे पूर्ण गावामध्ये आग हवेसारखी पसरली. नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना फार यश मिळाले नाही. दरम्यान आगीची माहिती धारणी माहित होताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. अचलपूर व बर्‍हाणपूर येथील अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. दोनही ठिकाणचे अग्नीशमन बंब गावात पोहचेपर्यंत जवळपास ७० घरे व ३० घरे गोठे जळून खाक झाले होते. तसेच ४ बैल आणि जवळपास १५ बकर्‍यांची जिवित हानी झालेली आहे. आलेल्या अग्नीशमन दलाने आगीची धग कमी केली. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरातील पुर्ण साहित्याची राखरांगोळी झाली आहे. हवा सुरु असल्यामुळे ही आग सारखी पसरत गेली आणि त्या आगीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ६० कुटुंबांना या आगीने उघड्यावर आणले आहे. टुमदार भुलोरी गाव खंडरमध्ये रुपांतरीत झाले आहे. प्रशासनाचे कोणत्याच प्रकारचे नियंत्रण या आगीवर दिसून येत नव्हते. गंभीर बाब अशी की, गावकर्‍यांनी व जवळच्या गावकर्‍यांनी या आगीवर नियंत्रण करण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लावला. त्यांनीच आगीवर नियंत्रण मिळविले. उशिराने पोहचलेल्या अग्नीशमन दलाने फक्त आगीची दाहकता कमी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसडीओ राहूल जाधव, तहसिलदार सचीन खांडे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, ठाणेदार कुळकर्णी घटनास्थळी पोहचले. आगीचे पंचनामे करण्यात येत आहे. आगपिडीतांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था गावातल्याच शाळेत करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. सर्व कुटुंबांना बुधवारी सानुग्राह अनुदान देण्यात येणार आहे.
धारणी अग्नीशमनचे वाहनच नाही
अमरावतीपासून १५० व अचलपूरपासून १०० किमी अंतरावर असलेल्या धारणी येथे अग्नीशमनचे वाहनच नाही. धारणी व आजुबाजुच्या खेड्यांमध्ये उन्हाळ्यात सातत्याने आगी लागतात. अनेक घरे दरवर्षी खाक होता. गरीब आदिवासी बांधवांचे नुकसान होते. अशी सर्व स्थिती डोळ्यासमोर असताना धारणी येथे अग्नीशमनचे वाहन देण्यात आलेले नाही. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देण्याची गरज धारणीवासियांनी बोलून दाखविली आहे.