फोर्ड कंपनी ७ हजार कर्मचारी कमी करणार

    दिनांक :21-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
वॉशिंग्टन, 
अमेरिकेतील वाहनउद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी फोर्ड मोटर्स आपल्या जगभरातील सात हजार कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. कंपनीच्या धोरणानुसार, फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के कपात करण्यात येणार असून, अनेक कर्मचार्‍यांच्या कामाची पुनर्रचना देखील करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑगस्टअखेरपर्यत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती फोर्डकडून देण्यात आली आहे.
 
 
फोर्डने अमेरिकेतील सेडान श्रेणीतील कारचे उत्पादन कमी करीत आणले आहे. कारण बहुतांश अमेरिकी नागरिक आता स्पोटर्‌‌स युटिलिटी व्हेईकलला (एसयुव्ही) पसंती देऊ लागले आहेत. मागील वर्षापासूनच फोर्डने यासंदर्भातील हालचालींना सुरुवात केली होती. उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या प्रकल्पांमधून फोर्डने याआधीच नोकरकपातीला सुरुवात केली आहे. या धोरणामुळे 60 कोटी डॉलर्सची बचत होणार आहे. त्याचबरोबर सध्या जरी पारंपरिक पद्धतीच्या वाहनांच्या विक्रीतूनच मोठा नफा होत असला, तरी फोर्डने विजेवरील वाहनांमध्ये स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करण्यास सुरु केली आहे. भविष्यात या श्रेणीतील वाहनांची बाजारपेठ पाहता कंपनीने हे धोरण आखले आहे.
 
कंपनीचे ‘एफ-150 पिकअप ट्रक’ हे सध्या सर्वाधिक खप होणारे वाहन आहे. एप्रिल 2018मध्ये फोर्डने कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. मार्च महिन्यात फोर्डने जर्मनीतील प्रकल्पातून 5 हजार कर्मचार्‍यांची कपात केली होती. ब्राझील आणि रशियासारख्या देशांमधील मोठ्या आकाराच्या व्यावसायिक ट्रकच्या निर्मितीच्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठीही फोर्डने पाऊले उचलली होती.