इंग्लंडच्या विश्वचषक संघात जोफ्रा आर्चर

    दिनांक :21-May-2019
लंडन,
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडने आपल्या अंतिम पंधरा सदस्यीय संघात बहुचर्चित खेळाडू जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे. वास्तविक इंग्लंडने जोफ्राचा १५ सदस्यीय प्राथमिक संघात समावेश केला नव्हता, परंतु अलिकडेच आयर्लण्ड व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याला विश्वचषकाची संधी मिळाली. लियाम डॉसन व जेम्स विन्स या दोघांनाही संधी देण्यात आली आहे.
 
 
बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या 24 वर्षीय जोफ्रा आर्चरकडे एकाही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नव्हता. परंतु ससेक्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली. तीन वर्षे देशांतर्गत कि‘केट हा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा पात्रतेचा निकष आहे. तो त्याने मार्च 2017 मध्येच पूर्ण केला. त्यामुळे विश्वचषकाचा संघ निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 23 मे पर्यंत दिलेली मुदत ही त्याच्यासाठी पर्वणी होती. प्राथमिक संघात असलेल्या खेळाडूंपैकी जो डेण्टली, ॲलेक्स हेल्स व डेव्हिड विली यांना डच्चू देण्यात आला आहे.
 
विश्वचषकासाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय अंतिम संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.