नासाने टिपले अंतराळातील ‘अल्टिमा थुले’ ग्रहगोलाचे छायाचित्र

    दिनांक :21-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
वॉशिंग्टन, 
नासाने अंतराळामधील एका ग्रहगोलाचे छायाचित्र टिपले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर असलेला हा ग्रहगोल आहे. विशेष बाब म्हणजे, या ग्रहगोलाची आकृती एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीसारखी आहे. हा ग्रहगोल प्लुटोपासून अब्जावधी मैल अंतरावर आहे. या ग्रहाला ‘अल्टिमा थुले’, असे नाव देण्यात आले असून, त्याचे छायाचित्र नासाच्या न्यू होरायजन या यानातून टिपण्यात आले आहे.
 

 
 
अल्टिमा थुले हा ग्रहगोल पृथ्वीपासून 6.64 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. हा ग्रहगोल दोन भागांमध्ये विभाजित असून, त्यातील मोठा भाग जो सपाट आहे त्याला ‘अल्टिमा’ नाव देण्यात आले आहे, तर त्याला जोडून असलेल्या गोल भागाला ‘थुले’, असे संबोधण्यात आले आहे. या ग्रहगोलाचे दोन्ही भाग जेथे जोडले जातात, त्याला ‘नेक’, असे नाव देण्यात आले आहे. 17 मे रोजी सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात याला ‘2014 एमयू 69’, असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या आकारामुळे हा ग्रहगोल ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीसारखा दिसतो. ग्रहांच्या निर्मितीवेळीच याची निर्मिती झाली असावी, असे मानले जाते.
 
 
 
नासाचे न्यू होरायझन यान सध्या पृथ्वी पासून 6.6 अब्ज किमी अंतरावर आहे. या ग्रहगोलाचा पृष्ठभाग लाल असून, त्यावर ज्वालामुखीही असावा, अशी शक्यता आहे. या ग्रहगोलावर शास्त्रज्ञांना मिथेनॉल आणि पाण्याच्या बर्फाचे काही अंशसुद्धा मिळाले आहेत.