मोईन उल हक पाकिस्तानचे नवे भारतीय उच्चायुक्त

    दिनांक :21-May-2019
- नव्या सरकारसोबत संवादासाठी नवी नियुक्ती : कुरेशी 
 
 
तभा ऑनलाईन टीम  
इस्लामाबाद,
सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांचे संबंध ताणले गेले आहेत. विशेषत: पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये अत्यंत कडवटपणा निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर, पाकिस्तानने मोईन उल हक यांची भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
  
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी मोईन हक यांची नियुक्ती ही भारत-पाकिस्तान संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हक हे भारतात उत्तम कामगिरी बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
भारतातील निवडणूक प्रक्रिया आटोपत आली असून, नवीन सरकार स्थापन होण्याच्या मार्गावर आहे. नव्या सरकारसोबत उत्तम संवाद साधण्यासाठी नवे उच्चायुक्त कार्य करतील, असे कुरेशी म्हणाले.
  
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी भारतासह चीन, जपान सोबतच सुमारे 24 देशांमधील उच्चायुक्त आणि राजदूत यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली. हक हे सध्या फ्रान्समध्ये राजदूत म्हणून कार्यरत आहेत. सोहेल मेहमूद यांची पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांचे पद रिक्त होते. मात्र, भारतातील निवडणुकांच्या समारोपाच्या वेळेसच पाकिस्तानच्या उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय.