यंदाचा विश्वचषक अधिक आव्हानात्मक : कोहली

    दिनांक :21-May-2019
मुंबई, 21 मे
भारतीय संघ विश्वचषकाच्या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज आहे. खेळाडूंसाठी लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे राहील. त्यानुसारच परिणाम असेल. विश्वचषकात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन एवढीच अपेक्षा आहे, असे मला वाटते. यंदाची विश्व स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने होणार असल्यामुळे आतापर्यंतच्या विश्वस्पर्धेपेक्षा ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक राहणार आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रपरिषदेत म्हणाला.
 
इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणार्‍या आयसीसी विश्वचषक 2019 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. 2011 नंतर प्रथमच विश्वचषक उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला.
 
1992 नंतर प्रथमच विश्वचषक क्रिकेट स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे विश्वचषकातील चुरस अधिक वाढवली आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक झाली आहे. 2015 नंतर अफगाणिस्तान सारख्या संघानेही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. प्रत्येक सामना हा संपूर्ण ताकदीने आणि शंभर टक्के योगदान देऊन खेळण्याची गरज आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्‌ट्या आणि इंग्लंडमधील वातावरणापेक्षा स्पर्धेचे दडपण कसे हाताळतो, हे महत्त्वाचे असणार आहे, असे तो म्हणाला.
 
आतापर्यंत मी एक खेळाडू म्हणून वन-डे विश्वचषकात खेळलो, पण आता खेळण्यासोबतच संघाचीही नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे हा विश्वचषक निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. जो संघ दडपणाचा चांगला सामना करू शकेल, तोच संघ विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
 
आमचे सर्व गोलंदाज ताजेतवाने आहेत व कोणीही गोलंदाज थकलेले नाही. ५० षटकांच्या सामन्यातही गोलंदाजांना ताजेतवाने ठेवणे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे हे आमचे ध्येय असणार आहे, असे विराटने स्पष्ट केले. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे आमच्या गोलंदाजी विभागाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, असे तो म्हणाला. अलिकडेच आयपीएलदरम्यान कुलदीपला दुखापत झाली होती, परंतु आता तो तंदुरुस्त झाला आहे.