मोदींच्या नेतृत्वावरील विश्वास!

    दिनांक :21-May-2019
 
सर्व वाहिन्यांच्या एक्झिट पोलने पुन्हा एकदा मोदी सरकारच्या बाजूने आपला कल दाखवला आहे. विशेष म्हणजे या मुद्यावर सर्वच एक्झिट पोलचे एकमत झाले आहे. एक्झिट पोलची आकडेवारी पाहिली, तर भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळत आहे, एखाद्दुसर्‍या वाहिनीचा अपवाद वगळता सर्वच वाहिन्यांनी भाजपाला तीनशेवर जागा दाखवल्या आहेत. यामुळे नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली आहे! 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काही साम्य दिसते आहे. 2014 मध्ये भाजपाचे सरकार येणार हे निश्चित मानले जात होते, पण भाजपा स्वबळावर बहुमत मिळवेल, याची खात्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह वगळता अन्य कुणालाच नव्हती. मात्र, त्या वेळी भाजपाने स्वबळावर 282 चा आकडा गाठून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
 
 
 
यावेळीही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात तशीच होती. भाजपाचेच सरकार बनेल, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, पण भाजपाच्या जागा काही प्रमाणात कमी होतील, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाला सरकार स्थापन करावे लागेल, असे मानले जात होते. भाजपा नेत्यांच्या विधानांनीही या चर्चेला बळ मिळाले होते. पण, एक्झिट पोलने यावेळी सर्वांचे आडाखे पुन्हा चुकवले आहेत. भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत दिले आहे. 2014 प्रमाणेच भाजपा स्वबळावर बहुमत मिळवल्यानंतरही यावेळी पुन्हा आपल्या मित्रपक्षांना सरकारमध्ये सामावून घेईल, याची खात्री आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीतून काही निष्कर्ष निघतात, ते म्हणजे यावेळीही लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालला. 2014 च्या निवडणुकीत मोदी यांची दृश्य लाट होती, तर यावेळी मोदी यांची अदृश्य लाट होती. यावेळी देशभर मोदी यांच्यासाठीच आणि त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी लोकांनी मतदान केले. गडकरींसारखा अपवाद वगळता आपल्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण आहे, याच्याशी लोकांना काहीच देणेघेणे नव्हते. त्यांना मोदींना पंतप्रधान करायचे होते. देशभर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लोकांनी मतदान केल्याचे या एक्झिट पोलवरून दिसत आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील लोकांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. भाजपाने या दोन राज्यांत मारलेली मुसंडी हे यावेळच्या निकालाचे वैशिष्ट्य राहू शकते. मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी लोकांनी भाजपाच्याच नाही, तर भाजपाच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही मतदान केले. बिहारमध्ये तर लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवार रिंगणात होते, पण या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना लोकांनी स्पष्ट सांगितले, तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येऊ नका, आम्ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहोत. या एक्झिट पोलने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी, कॉंग्रेस महासचिव श्रीमती प्रियांका गांधी यांना मोठा धक्का बसू शकतो. या दोघांच्याही नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.
राफेल मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर ठरवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न होता. मोदी यांना चोर ठरवत स्वत: साव होण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न देशातील मतदारांनी हाणून पाडला. चौकीदार चोर आहे, असे राहुल गांधी बेंबीच्या देठापासून ओरडत असले तरी देशाच्या सुरक्षेसाठी, एकता आणि अखंडतेसाठी नरेंद्र मोदींसारख्या चौकीदाराची गरज असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. चोर मोदी नाही तर त्यांना चोर म्हणणारेच आहेत, असा मतदारांचा कौल दिसतो आहे. या निवडणुकीत अन्य सारे मुद्दे बाजूला सारत, मतदारांनी राष्ट्रवादाच्या मुद्याला प्राधान्य दिल्याचे दिसते आहे. राफेल, नोटबंदी, जीएसटी, बेरोजगारी, शेतकर्‍यांची स्थिती आणि ढासळती अर्थव्यवस्था याचा कोणताच परिणाम या निवडणुकीवर झाला नाही.
एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार निकाल लागले, तर भाजपावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची आधीच मजबूत असलेली पकड आणखी भक्कम होणार आहे. पक्षाबाहेरील आणि पक्षांतर्गत मोदी विरोधकांची बोलती पुढच्या पाच वर्षांसाठी पुन्हा बंद होणार आहे. अमित शाह खर्‍या अर्थाने भाजपाचे चाणक्य असल्याचे दिसून येणार आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रियांका गांधी-वढेरा या उत्तरप्रदेशात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. प्रियांका यांच्या येण्याने उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला काहीच फायदा झाला नाही, कॉंग्रेसची एकही जागा वाढली नाही. उत्तरप्रदेशात आधीही कॉंग्रेसच्या दोन जागा होत्या, आताही दोनच जागा कायम राहतील, असा एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. प्रियांका कॉंग्रेसच्या तारणहार ठरू शकत नाहीत, हे यातून दिसून येत आहे. या एक्झिट पोलने कॉंग्रेससह अन्य सर्वच विरोधी पक्षांची दाणादाण उडवली आहे. गुडघ्याला पंतप्रधानपदाचे बािंशग बांधून फिरणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांना मतदारांनी त्यांची जागा आणि लायकी दाखवली, असे म्हणावेसे वाटते. 24 मे रोजी विरोधी पक्षांची आघाडी आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी बैठक घेणार होती, त्यात आता िंकचित बदल होऊ शकतो. 24 मेऐवजी त्यांना मे 24 मध्ये अशी बैठक घ्यावी लागू शकते, असा विनोद समाज माध्यमांवर फिरू लागला आहे, तो उगाच नव्हे!
एक्झिट पोलचे निष्कर्ष शंभर टक्के खरे ठरले, तर देशाच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. उत्तरप्रदेशातील बहुचर्चित सपा आणि बसपा आघाडी फार दिवस टिकणार नाही. अन्य विरोधी पक्षांच्या तथाकथित ऐक्याचा फुगाही फुटू शकतो. पश्चिम बंगालच्या आक्रस्ताळ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फटका बसणार हे आता स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने अपेक्षेप्रमाणे जागा जिंकल्या, तर ममता बॅनर्जी यांची हकालपट्‌टी झाली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावली गेली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मध्यप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमधील कॉंग्रेसशासित राज्य सरकारांच्या स्थैर्यावरही एक्झिट पोलनंतर येणार्‍या निकालांचा परिणाम होऊ शकतो. मायावती यांची बसपा, कॉंग्रेस सरकारांचा पाठिंबा काढून घेऊ शकते. कारण, मायावती उत्तरप्रदेशातील सपा-बसपा आघाडीच्या पानिपताचे खापर कॉंग्रेसवर फोडल्याशिवाय राहणार नाहीत. कॉंग्रेसने आमची मते खाल्ल्यामुळे आमचा पराभव झाला, असे रडगाणे अखिलेश यादव नव्हे, तर मायावती गाऊ शकतात. नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र आले होते. मोदी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर जेवढा हल्ला चढवला जातो, त्यांचे नेतृत्व तेवढेच उजळून निघते. मोदींना बदनाम करण्याचा जेवढा प्रयत्न होतो, तेवढीच त्यांची लोकप्रियता उसळी घेत असते. देशाचे भवितव्य नरेंद्र मोदींच्या हातातच सुरक्षित राहू शकते, असा विश्वास मतदारांनी आपल्या कौलातून व्यक्त केला आहे. हाच या एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. एक्झिट पोलचा निष्कर्षच अंतिम मतमोजणीतून यावा, अशी कोट्यवधी लोकांची मनोमन इच्छा आहे...