सई ताम्हणकर म्हणतेय, मीच अमेयची गर्लफ्रेंड

    दिनांक :21-May-2019
अभिनेता अमेय वाघ मराठी चित्रपट सृष्टीतील एक युवा चेहरा म्हणून ओळखला जातो. प्रायोगिक नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या काही दिवसांपासून अमेय त्याच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टद्वारे अमेय चाहत्यांकडून मुलीचे नाव सुचवण्यासाठी मदत मागत होता. पण नंतर हे नाव त्याच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटासाठी असल्याचे समोर आले. आता या चित्रपटात अमेयसह कोणती अभिनेत्री दिसणार याचा खुलासा झाला आहे.
 
 
‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अमेयसह सई ताम्हणकर दिसणार असल्याचे खुद्द सईने ट्विटरद्वारे सांगितले आहे. ‘मीच ती’ असे लिहीत सईने गर्लफ्रेंडचे पोस्टर ट्विट केले आहे. या चित्रपटात अमेय नचिकेत प्रधान ही भूमिका साकारणार असून सई अलिशाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहाता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. तसेच चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर आहे. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करणार आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
‘जरा मदत हवीये तुमची, मुलीसाठी नाव सुचवा प्लीज,’ अशी पोस्ट अमेयने काही दिवसांपूर्वी केली होती. अमेयने फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळाल्या. इतकंच नाही तर अभिनेत्री प्रिया बापट, निपुण धर्माधिकारी यांनीसुद्धा मुलीसाठी नावे सुचवली. अमेयचे २०१७ मध्ये साजिरी देशपांडेसोबत लग्न झाले. त्यामुळे त्याच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार का ? त्याच्यासाठी अमेयला नाव हवय का ? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. परंतु आता सर्व गोष्टींचा खुलासा झाला आहे.