अमूल दूध झाले महाग

    दिनांक :21-May-2019
 नवी दिल्ली: उत्पादन मूल्य वाढल्याने आज मंगळवारपासून दिल्ली-केंद्रशासित प्रदेश आणि महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये दुधाचे दर दोन रुपये प्रतीलिटरने वाढवले जातील, असे दुग्धजन्य उत्पादनातील आघाडीची कंपनी अमूलने स्पष्ट केले आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे अमूल ब्रॅण्डअंतर्गत उत्पादन करणार्‍या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने (जीसीएमएमएफ) दोन वर्षांपूर्वी म्हणजे मार्च 2017 मध्ये दुधाच्या दरांचा आढावा घेतला होता, असे या महासंघाने निवेदनात म्हटले आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कोलकाता, उत्तरांचल आणि इतर मोठ्या बाजारपेठांमध्ये अमूलच्या सहाही उत्पादनांचे दर 21 मे पासून वाढवले जातील, असेही निवेदनात म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये अर्धा लिटर अमूल गोल्ड 27 रुपयांत, अमूल शक्ती 25 रुपयांत, अमूल ताजा 21 रुपयांत आणि अमूल डायमंड 28 रुपयांत विकले जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे. गुजरातमध्ये विकल्या जाणार्‍या गायीच्या दूध दरात कोणतेही बदल होणार नाहीत. दूध पुरवठादारांना योग्य दर देण्यासाठी आणि उत्पादन मूल्यात कपात करण्यासाठी दोन वर्षांनंतर प्रतीलिटरमागे दोन रुपयांनी दर वाढवण्यात आल्याचे महासंघाने निवेदनात म्हटले आहे.