तामिळनाडूतलं अनोखं मंदिर

    दिनांक :21-May-2019
भारतातल्या प्रत्येक मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरांबाबत बरंच काही बोललं जातं. तमिळनाडूतल्या तिरूचिरापल्लीमध्येही असंच अनोखं मंदिर आहे. थामुमाना स्वामी मंदिर या नावाने ते ओळखलं जातं. स्थानिक लोक या मंदिराला थायुमानावर असंही म्हणतात. थामुमाना स्वामी हे शंकाराचं मंदिर आहे. तमिळनाडूत भगवान शंकराला थामुमानावर असं म्हटलं जातं. याच नावाने त्याची पूजा केली जाते. थायुमानावर म्हणजे भक्तरक्षणासाठी आईचं रूप धारण करणारा. 
 
 
या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, दानगुप्त नावाचा व्यापारी आपली पत्नी रत्नावलीसोबत रहात होता. दक्षिण भारतातून वाहणार्‍या कावेरी नदीच्या उत्तरेकडे असलेल्या नगरात हा व्यापारी रहात असे. पती-पत्नी भगवान शंकराचे भक्त होते. गरोदर असताना रत्नावली भगवान शंकराचं दर्शन करायला गेली होती. त्यावेळी जोराचा पाऊस आला. अशा वेळी तिने मंदिरातच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी रत्नावलीच्या पोटात दुखू लागलं. ती वेदनांनी कळवळली.
 
यावेळी तिने शंकराची आराधना केली. रत्नावलीच्या आईचं रूप घेऊन भगवान शंकर तिच्याजवळ आले. प्रसूतीदरम्यान तिला सगळी मदत केली. रत्नावली बाळंतीण झाली. सगळं काही सुखरूप पार पडलं. त्यानंतर रत्नावलीची आई तिच्याकडे आली. तोपर्यंत भगवान शिव अंतर्धान पावले होते. भगवान शंकर आईच्या रूपात आपल्याकडे आले होते, हे रत्नावलीच्या लक्षात आलं. तिने शंकराचे आभार मानले. त्यामुळे गरोदर स्त्रिया या मंदिरात येतात. आपल्या बाळाच्या आयुरारोग्याची कामना करतात. श्रद्धा आणि भक्तीने आपली सेवा करणार्‍या भाविकांना भगवान शंकर उत्तम फळ देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.