बीएमडब्ल्यू एक्स 5चे नवीन मॉडेल भारतात

    दिनांक :21-May-2019
सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत अनावरण
 
मुंबई: बीएमडब्ल्यू या कारनिर्मितीतील आघाडीच्या कंपनीतर्फे तयार करण्यात आलेल्या एक्स 5 2019 या मॉडेलची वाहने लवकरच भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. मालिकेतील या चौथ्या आवृत्तीच्या वाहनाचे भारतात गुरुवारी अनावरण करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात कंपनीचा सदिच्छादूत व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या आलिशान आणि दणकट गाडीचे अनावरण करण्यात आले.

 
 
बीएमडब्ल्यूने सध्या डिझेलवर चालणारी तीन एक्स 5 मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केली आहेत. पेट्रोलच्या चौथ्या मॉडेलची विक्री 2019 च्या अखेरीस सुरू होईल, असे कंपनीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या एक्स-शोरुम किमती या 73 ते 83 लाखांच्या घरात आहेत.
बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 30 डी ‘स्पोर्ट’ची िंकमत 72 लाख 90 हजार रुपये, बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 30 डी ‘एक्स लाईन’ 82 लाख 40 हजार रुपये आणि बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 40 आय ‘एम स्पोर्ट’ची िंकमत 82 लाख 40 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
195 किलोवॅटचे शक्तिशाली बीएस सहा श्रेणीतील इंजिन 265 अश्वशक्तीची ताकद या गाडीला उपलब्ध करून देते. एसएव्ही (स्पोर्ट्स अॅक्टिव्हीटी व्हेईकल) श्रेणीतील ही कार आपल्या 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ताशी 0 ते 100 किमीचा वेग अवघ्या सहा सेकंदात गाठू शकते. बीएमडब्ल्यूची एक्स ड्राईव्ह टेक्नॉलॉजी ड्रायव्हिंग कंडिशननुसार गाडीत ऑटोमेटिक बदल करून घेते.
1999 मध्ये पहिली एक्स 5 बाजारात आल्यापासून कंपनीचे हे आजवरचे सर्वात यशस्वी मॉडेल ठरले आहे. बीएमडब्ल्यूने जगभरात दोन कोटींपेक्षा अधिक एक्स 5 ची विक्री केलेली आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही कार बीएमडब्ल्यूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणार यात शंकाच नाही.