शेअर बाजाराने गमावला ऐतिहासिक स्तर

    दिनांक :21-May-2019
निर्देशांकात 383 अंकांची घसरण
 
मुंबई: सकाळची सुरुवात 200 पेक्षा जास्त अंकांनी झाल्यानंतरही गुंतवणूकदारांच्या नफा कमावण्याच्या वृत्तीमुळे मुंबई शेअर बाजार 383 अंकांच्या घसरणीसह ऐतिहासिक उंचीवरून खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजारातही 119 अंकांची घसरण झाली.
केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार, असे भाकीत रविवारी वृत्तवाहिन्यांनी वर्तविल्यानंतर सोमवारी शेअर बाजाराने 1,422 अंकांची विक्रमी कमाई करून, ऐतिहासिक 39,353 अशी उंची गाठली होती. त्यानंतर आज मंगळवारी व्यवहार सुरू होताच, त्यात 205 अंकांची भर पडली. दुपारच्या व्यवहारात मात्र गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढले आणि बाजारात घसरणीला सुरुवात झाली. याच काळात काही कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीवरही भर दिला. यामुळे दुपारच्या सत्रात बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. यात निर्देशांक 39,571.73 अशा ऐतिहासिक उंचीवर जाऊन, 38,884.85 अशा नीचांकावरही आला होता. दिवसभराच्या उलाढालीनंतर 382.87 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 38,969.80 या स्तरावर बंद झाला. आजच्या व्यवहारात टाटा मोटर्सला सर्वाधिक नुकसान झाले. याशिवाय, मारुती, इंडसइंड बँक, मिंहद्र अॅण्ड मिंहद्र, भारती एअरटेल, स्टेट बँक, पॉवर ग्रीड, हिरो मोटर्स, टाटा स्टिल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, यस बँक आणि टीसीएसला नुकसान सहन करावे लागले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 119.15 अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी 11,709.10 या स्तरावर बंद झाला.