वृध्द महिलेस मारहाण करून बैल पळविणारा चोरटा जेरबंद

    दिनांक :21-May-2019
कारंजा ग्रामीण पोलिसांची कार्यतत्परता
कारंजा लाड:  येथील ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणा-या ग्राम शहा येथील ७० वर्षीय वृध्द महिलेस जबर मारहाण करून बैल पळविणा-या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा सिध्दनाथपूर येथील चोरट्यास पोलिसांनी ब्राह्मणवाडा गांवानजीक  काही तासातच बैलासह जेरबंद केले . यामुळे कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कर्म-यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे .
 
 
 
सविस्तर असे की ग्राम शहा येथील लक्ष्मीबाई किसनराव क्षीरसागर ही सोमवार दि . २० मे रोजी सकाळी ७ वाजता कारंजा येथील बैल बाजारात एक बैल विक्री साठी घेवून आली होती. मात्र दुपार पर्यंत बैलासाठी एक ही खरेदीदार सापडला नसल्याने दुपारी एक ते दिड वाजता च्या समारास २७ हजार रुपये किंमतीच्या एका बैलासह शहा गांवाकडे पायदल जात असताना शहा गावाच्या अलीकडे १ किलोमीटर अलीकडे समृद्धी महामार्गावरून जात असताना अज्ञात चोरट्याने वृध्द महिलेस जबर मारहाण करून बैल पळविल्याची घटना फिर्यादी वरून संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी नोंद घेवून गंभीर जखमी लक्ष्मीबाई वर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारंजा ग्रामीणपोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी डि. बी. स्काॅड. मधील कर्मचा-या च्या सहकार्याने युध्दपातळीवर शोध मोहीम राबवून अवघ्या काही तासातच ब्राह्मणवाडा गांवाजवळ बैल चोरट्यास बैलासह जेरबंद करून गजाआड केले .
या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा सिध्दनाथपूर येथील सोपान शिवदास रंगे वय ३८ यांचे विरूध्द अपराध नं. ३९ / १९ प्रमाणे भा.द.वि. च्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस गजाआड केले.
बैल पळविणा-या चोरट्याच्या शोध मोहीमेत कारंजा ग्रामीणपोलिस स्टेशन चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली डि. बी. स्काॅड चे साहेबराव राठोड , मयुरेश तिवारी , अमित भगत , मदन सानप , मेश्राम आदींनी सहभाग घेतला होता . घटनेचा पुढील तपास कारंजा ग्रामीणपोलिस स्टेशन चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत घटनेनंतर काही तासातच बैलासह चोरट्या स जेरबंद करणा-या कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या कर्म-यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.