शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीच्या हालचाली

    दिनांक :21-May-2019
भाजपा विधानसभेच्या तयारीला
 
मुंबई: लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. फडणवीस सरकार लवकरच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे, असे सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकार हे मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती प्रत्येक जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे. मार्च 2016-17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकर्‍यांची कर्जमाफी करून त्यांना मोठा दिलासा देण्याचे सरकारचे प्रयत्न असणार आहेत.
 
 
 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकर्‍यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.
संघटन मंत्र्यांची काल माझ्यासोबत बैठक झाली, आज कार्यकारिणीची बैठक होत आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. दुष्काळासंदर्भातील मदत सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले आहेत. दोन वर्षांपासून जशी लोकसभेची तयारी सुरू केली त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच वर्षांत सर्व पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार, असे यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पात्रधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी सुरूच राहील, असेही रावसाहेब दानवेंनी सांगितलं.