कौटुंबिक दबावाखाली झुकणार नाही, निर्णयावर ठाम : द्युती चंद

    दिनांक :21-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
भुवनेश्वर,
मी कौटुंबिक दबावाखाली झुकणार नाही, असे भारताची अव्वल धावपटू द्युती चंद म्हणाली. गत रविवारी द्युती चंद हिने आपले एका मुलीशी समिंलगी संबंध आहे असे जाहीर केले. त्यानंतर द्युतीची बहीण सरस्वती चंद्र हिने तिला घराबाहेर हाकलून लावण्याची व तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली होती. त्या अनुषंगाने द्युती चंद पत्रकार परिषदेत बोलत होती. द्युती सध्या आगामी विश्व ॲथ्लेटिक्स स्पर्धेसाठी पूर्वतयारी करत आहे.
 
 
मी आपल्या जोडीदारचे नाव उघड करू इच्छित नाही. कारण मी तिच्या इच्छेचा आदर करते. माझी 19 वर्षीय जोडीदार सध्या भुवनेश्वरमध्ये शिकत आहे. गत पाच वर्षांपासून आम्ही दोघी एकमेकींना चांगले ओळखतो व आमची चांगली मैत्री आहे. तिलाही खेळाडू व्हायचे आहे. त्यामुळे ती सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे येत असते. गत काही वर्षात आमची जवळीकता वाढली. ती माझ्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहे, माझा आत्मा आहे, असेही द्युती चंद म्हणाली.
 
मी माघार घेणार नाही. मी सज्ञान आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि मला समिंलगी संबंधांमध्ये असल्याबाबत अजिबात वाईट वाटत नाही किंवा लाज वाटत नाही, असेही स्पष्टपणे म्हणाली.