माझ्या हत्येची मोदींची इच्छा

    दिनांक :21-May-2019
अरिंवद केजरीवाल पुन्हा बरळले
 
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझीदेखील हत्या होईल, असा खळबळजनक दावा करत गोंधळ उडवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना आपला मृत्यू व्हावा असे वाटत असल्याची बडबड केली आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश असून दिल्ली पोलिस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारित येते. अरिंवद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सर्व अधिकार राज्य सरकारकडे दिले जावेत, अशी मागणी केली आहे.
 
 
 
ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्यासोबत ट्विटरवर झालेल्या चर्चेत अरिंवद केजरीवाल यांनी लिहिले आहे की, विजयजी... माझ्या खाजगी सुरक्षा अधिकार्‍याला नाही, तर नरेंद्र मोदींना माझी हत्या व्हावी असे वाटत आहे.
अरिंवद केजरीवाल यांनी विजय गोयल यांच्या ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली होती. आपल्या खाजगी सुरक्षा अधिकार्‍यावर संशय घेत तुम्ही दिल्ली पोलिसांचे नाव खराब केले आहे. तुम्हीच तुमचा खाजगी सुरक्षा अधिकार निवडणे जास्त योग्य ठरेल. तुम्हाला या संदर्भात मी काही मदत करू शकत असेल तर तसे कळवा. दीर्घायुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे ट्विट विजय गोयल यांनी केले होते.
याआधी पंजाबमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरिंवद केजरीवाल यांनी इंदिरा गांधींप्रमाणे खाजगी सुरक्षा अधिकार्‍याकडून आपली हत्या होईल, असा दावा केला होता. अरिंवद केजरीवाल यांच्या या दाव्यामुळे वाद निर्माण झाला होता. दिल्ली भाजपाने पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल यांचा सुरक्षा काढून घेण्यास सांगितले होते. दिल्ली भाजपा प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल यांना माफी मागण्यास सांगा, असं सांगितले होते.