राफेल नदालला इटालियन ओपनचे विजेतेपद

    दिनांक :21-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
रोम ,
“क्‍ले कोर्टचा’ बादशाह राफेल नदालने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्याकडे राखले. अंतिम लढतीत नदालने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा संघर्षपूर्ण पराभव करत 34वे मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आहे. 
 
जागतिक क्रमवारीत 31 वर्षीय जोकोविच अव्वल, तर 32 वर्षीय नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. यावेळी सामन्याच्या सुरूवातीपासुनच नदालने जोकोविचवर वर्चस्व गाजवलेले दिसले. जोकोविचला पहिल्य सेट मध्ये एकही गेम आपल्या नावे करता आला नाही. त्यामुळे नदालने पहिला सेट 6-0 अशा फरकाने एकतर्फी आपल्या नावे केल्याने सामन्यात त्याने 1-0 अशी आघाडी घेतली. यावेळी पहिल्या सेटमध्ये एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागलेल्या जोकोविचला आपले आव्हान कयम राखण्यासाठी दुसरा सेट जिंकणे महत्वाचे होते. त्यामुळे त्याने सामन्यात जोरदार पुनरागमन करत नदालवर दबाव वढवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पहिल्या सेट मध्ये मिळवलेल्या विजयाने नदाल लयीत आलेला दिसला आणि नदालने दुसऱ्या सेट मध्ये कदवा प्रतिकार केल्याने सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला होता. सहाव्या गेमअखेर दोघांत 3-3 अशी बरोबरी होती. त्यामुळे सामना कोणत्याही बाजुला झुकेल अशी परिस्थीती असताना जोकोविचने पुन्हा सामन्यात पुनरागमन करत दुसरा सेट 4-6 अशा फरकाने जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
यावेळी तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा राफेल नदालने पुनरागमन करत जोकोविचवर एकतर्फी वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. त्यामुळे तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचला पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही. यावेळी नदालने तिसऱ्या सेट मध्ये 6-1 अशी बाजी मारत तिसऱ्या सेट सह सामना आपल्या नावे केला.
तत्पूर्वी, पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात नोव्हाक जोकोविचने अर्जेंटिनाच्या डिएगो श्‍वार्टजमॅनला दोन तास 31 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-3, 6-7, 6-3 असे पराभूत केले होते. तर, राफेल नदालने ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासला 6-3, 6-4 असे पराभूत करत अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला होता.