असांजेचा ताबा घेण्याबाबत स्वीडनचा पुढाकार

    दिनांक :21-May-2019
स्टॉकहोम,
विकिलिक्सचा सहसंस्थापक ज्युलियन असांजे याला ताब्यात देण्याबाबत स्वीडनच्या सरकारने स्वीडनच्या न्यायालयाला विनंती केली आहे. स्वीडनच्या सरकारी खटले बघणार्‍या विभागाच्या उपसंचालक ॲड. इव्हा पेरसन यांनी आज सोमवारी येथील जिल्हा न्यायालयात याबाबत अर्ज दाखल करून असांजेला स्वीडनच्या हवाली करण्यात यावे, असे म्हटले आहे. 

 
 
न्यायालयाने जर असांजेला ताब्यात घेण्याचा निर्णय दिला, तर त्याच्या स्वीडनमधील प्रत्यार्पणाबाबत आपण युरोपियन अटक वॉरंट जारी करण्यासाठी ब्रिटिश अधिकार्‍यांना विनंती करू, असे ॲड. इव्हा पेरसन यांनी आज सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.
स्वीडनमधील शिक्षेपासून वाचण्यासाठी मागील सात वर्षांपासून असांजे लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासमध्ये आश्रयाला होता. इक्वेडोरने त्याला दिलेला राजनैतिक आश्रय काढून घेतला होता. यानंतर तेथील राजदूतांनी पोलिसांना बोलावून त्याला अटक करायला लावली होती.
 
असांजे हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. याविरोधात लंडनच्या न्यायालयाने 2012मध्ये अटक वॉरंट जारी केला होता. यानंतर असांजेने इक्वेडोरकडे शरणागती पत्करली होती.
दरम्यान, अमेरिकेच्या न्याय विभागाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केल्याचा आरोप असांजेवर आहे. सध्या तो लंडन येथील तुरुंगात आहे.