सिंचनातून खतं

    दिनांक :22-May-2019
शेतीशसाठी उपलब्ध पाण्याच्या नियोजनाची गरज लक्षात घेता ठिबक, तुषार आणि सूक्ष्म फवारा सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्‍यांनी सुरू केला. परंतु खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन आता खतांच्या कार्यक्षम वापराची गरज निर्माण झाली आहे. ती सिंचनातून खतं म्हणजे फर्टीगेशन या तंत्रामुळे पूर्ण होऊ शकते. याद्वारे ठिबक सिंचनातून उभ्या पिकांना खतं पुरवली जातात. ही खतं पाण्यात सहज विरघळणारी असतात. 
 
 
आधुनिक सिंचनातून खतं वापरण्याचे तंत्र आपल्या शेतकर्‍यांना नवं आहे. त्यामुळे मोजके शेतकरी या पद्धतीचा अवलंब करताना आढळतात. सिंचनातून द्यावयाची द्रवरूप खतं भारतात फारच कमी प्रमाणात तयार केली जातात. बहुतेक करून अशी खतं परदेशातून आयात केली जातात. परंतु अलीकडे सिंचनातून द्यावयाची घनरूप खतं यसा देशात वापरली जात आहेत.
 
सिंचनातून खतं देण्याचे फायदे
  1. पिकांची वाढीची अवस्था आणि त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात ठोस स्वरूपाची वाढ होते.
  2. ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यानं पिकांना पाणी आणि पोषण द्रव्यांचा पुरवठा मुळांजवळ होतो. त्यामुळे पाण्याचा, पोषण द्रव्यांचा र्‍हास होत नाही.
  3. द्रवरूप खतांच्या रूपाने मुख्य पोषणद्रव्यांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो.
  4. ही खतं सिंचनातून दिल्यास तीव्र द्रावण सौम्य होतं. त्यामुळे पिकांच्या मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
  5. ही खतं नियमित आणि कमी प्रमाणात वापरल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्यांचा साठा कमी, नियंत्रित असतो. त्यामुळे अती पावसानं निचर्‍याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीचंं पाणी वाहून गेल्यानं पोषकत्व जात नाही आणि खतांची एकूण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत बचत होते.
  6. कीटकनाशकं आणि तणनाशकं द्रवरूप खतात मिसळून दिल्यानं मजूर, यंत्रसामग्री आणि एकूण आर्थिक बचत होते.
  7. हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमिनीत पिकांचं उत्पादन घेण्यासाठी खास व्यवस्थापनाची गरज असते. अशा स्थितीत सिंचनातून खतं दिल्याने पीक उत्पादनात वाढ करता येते.
  8. द्रवरूप खतं देण्याच्या विशिष्ट पद्धतीनं जमिनीचा पृष्ठभाग कठीण होत नाही.