बियाण्यांची उगवण क्षमता

    दिनांक :22-May-2019
आपल्या घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती आणि उगवलेल्या रोपांच्या योग्य वर्गीकरणाची माहिती घेऊ.
बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी? 

 
 
- बियाण्याची एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्याच्या प्रतिकात्मक नमुन्यातील कमीत कमी 400 बी तपासावे लागते.
 
- ज्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावयाची आहे, त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.
 
- प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी आवश्यक असणार्‍या साहित्यामध्ये उगवण कक्ष (जर्मिनेटर) हे मुख्य उपकरण आहे. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्यक लागणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते, तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात. याला ‘टॉवेल पेपर’ असे म्हणतात. ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.
उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती :
  1. शोषकागदाच्या वरती : लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता याप्रकारे तपासली जाते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे. पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मिनेटरमध्ये) उगवणीसाठी ठेवाव्यात चांगल्याप्रकारे आर्द्रता (70 टक्क्यांपेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी उगवण होण्यास पुरेसे होते.
  2. कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे : उगवणक्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदांमध्ये (टॉवेल पेपर) बी मोजून ठेवावेत. असे कागद गोल गुंडाळी करून किंवा त्यावर मेणकागद (वॅक्स पेपर) खालच्या 3/4 भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्यक असणार्‍या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये ठेवतात. ओला कागद बोटाने दाबला असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा.
  3. वाळूमध्ये उगवणक्षमता पाहणे : कुंडी किंवा ट्रेेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत एक ते दोन सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावेत. बियांच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवतात.
  4. बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे. त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण आठ-10 दिवसांत बियाण्यांची उगवण होते.