बीसीसीआयची निवडणूक 22 ऑक्टोबर रोजी

    दिनांक :22-May-2019
- प्रशासकीय समितीची घोषणा
 
नवी दिल्ली, 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक 22 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा प्रशासकीय समितीने केली आहे.
 
बीसीसीआयचे कामकाज सुरळीत व पारदर्शी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2017 मध्ये लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी प्रशासकीय समितीची नियुक्ती केली होती. अलिकडेच न्यायालय मित्र पी.एस. नरसिम्हा यांनीही बीसीसीआयमध्ये निवडणुका घेण्याची सूचना आपल्या अहवालात केली होती. नरसिम्हा यांनी विविध राज्य संघटनेशी संवाद साधून अहवाल तयार केला व तो न्यायालयात सादर केला.
 
 

 
 
 
 
प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, सदस्य डायना एडल्जी व रवी थोडगे यांनी राज्य संघटनेला 14 सप्टेंबर ही निवडणुका घेण्याची अंतिम मुदत दिली आहे. 30 राज्य संघटनांनी लोढा समितीच्या शिफारशी लागू केल्या आहे व उर्वरित संघटना शिफारशीनुसार आपल्या घटनेत सुधारणा करत आहे, असे राय म्हणाले.
 
सर्वोच्च न्यायालयाने माझी नियुक्ती केली. माझी भूमिका नाईटवॉचमनसारखी असून बराच काळ ही भूमिका बजावली. आमची भूमिका विशेष असल्यामुळे आम्ही आनंदित आहो. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचे संघटनेला अनिवार्य केले. हे फार जिकरीचे काम होते. आता त्यांच्याकडे बीसीसीआयचे कामकाज सोपविताना आनंद होतो, असे विनोद राय म्हणाले.