शितावरून भाताची परीक्षा!

    दिनांक :22-May-2019
प्रासंगिक  
 
 विलास पंढरी 
 
 
 
 
एप्रिलअखेरीस 10 दिवस मी, दिल्ली, उत्तरप्रदेश व उत्तराखंडच्या दौर्‍यावर होतो. तेव्हा एक मुक्तछंद पत्रकार म्हणून शेकडो लोकांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. एक्झिट पोलचे अंदाज त्या चर्चेशी तंतोतंत जुळणारे आहेत. व्यापारी, टॅक्सी व रिक्षा ड्रायव्हर, महिला या सर्वांचे मत दिल्लीतील सर्व जागा भाजपा जिंकेल, असे होते. केजरीवालांवर सर्वच लोक नाराज होते. ड्रायव्हर्स बहुतेक मुस्लिम भेटले. त्यातील एकही भाजपाच्या बाजूने नव्हता. भाजपाला विरोध करण्याचे सयुक्तिक कारण मात्र एकालाही सांगता आले नाही. हमाल, हातगाडीवाले मायावतींना मानणारे होते. यूपीतील मुस्लिम कॉंग्रेस व सपाला मानणारे जाणवले, तर यादव समाज सपा व भाजपामधे सारखाच विभागलेला दिसला. उत्तराखंडमधे पाचही जागा भाजपा जिंकेल, असे बहुसंख्य लोकांचे मत होते. महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे अंदाज मात्र बरोबर वाटत नाहीत. युतीला यापेक्षा चांगले यश मिळेल, असे अनेकांशी केलेल्या चर्चेवरून वाटते.
‘शितावरून भाताची परीक्षा,’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. भात कितपत शिजला आहे, हे याच्यात लगेच कळते. निवडणुकीचे अंदाज दाखवणारी सर्वेक्षणे तंतोतंत नाही, पण काही प्रमाणात या म्हणीला लागू पडतात.

 
 
सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलिंपग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता. तेव्हा टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होते. हा एक्झिट पोल दूरदर्शनसाठी करण्यात आला होता. मतदानाच्या दिवशीच, मतदान करून आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं हे विचारलं जातं. मानसशास्त्र असं सांगतं की, मतदानानंतर अर्धा तास मतदार, मतदान कुणाला केलं हे खरं खरं सांगण्याच्या मन:स्थितीत असतो. मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती अगोदरच घेऊन ठरावीक मतदार केंद्रे निवडली जातात. सांख्यिकी पद्धतीने, मतदान करून येणारा साधारण विसावा/पंचेविसावा मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. त्याचं विश्लेषण करून आकडेवारी निश्चित केली जाते. प्रत्येक मतदारसंघातलं कोणतं मतदान केंद्र निवडायचं, हे सांख्यिकी पद्धतीनेच ठरवलं जातं.
मतदाराला, त्याने कुणाला मत दिले असा प्रश्न विचारून त्या मतदाराचे लिंग, वय, शिक्षण, धर्म, जात, राहण्याचे ठिकाण यासारखी माहिती विचारून ती माहिती संकलित करणे म्हणजे एक्झिट पोल. ओपिनियन पोलचे अंदाज बदलू शकतात, कारण तो मतदानापूर्वी घेतला जातो. शिवाय वातावरणनिर्मितीसाठी विविध पक्षांकडून मॅनेजही केला जातो. त्यामुळेच ओपिनियन पोल वास्तवापासून भरकटलेले पाहायला मिळतात, तर एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो, कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो. या पोलचा, मतदान झाले असल्याने मतदारावर प्रभाव पाडण्यासाठी उपयोग नसल्याने कुठलाही राजकीय पक्ष मॅनेज करण्यासाठी खर्च करीत नाही. विविध वाहिन्या आपला टीआरपी वाढवण्यासाठी मात्र उपयोग करून बक्कळ पैसा कमवू शकतात.
भारतात 1996 साली पहिला एक्झिट पोल करण्यात आला. विशेष म्हणजे याला प्रशासनानेही पुरेपूर सहकार्य केलं होतं. एका ठरावीक वारंवारतेने येणार्‍या ठरावीक मतदाराला सांगितलं जायचं, की तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे. त्यानुसार त्यांच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारून घेतला जायचा. त्या वेळी इव्हीएम्स नव्हती. अगोदर ज्याला मतदान केलं, त्यालाच इथेही करा, असं सांगितलं जायचं. अशा पद्धतीने पहिला एक्झिट पोल केला गेला. इथेही मतदानंनंतर मतदार अर्धा तास खरे सांगण्याच्या मन:स्थितीत असतो, या गृहीतकाचा उपयोग करण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर, त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत. त्यानुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या जनमत अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत. मात्र, निवडणूक आयोगाची एक्झिट पोलचे अंदाज 19 मे म्हणजे मतदानाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी साडेसहानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतमतांतरे आहेत. नेदरलॅण्डमधील समाजशास्त्रज्ञ आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली, असे म्हटले जाते. 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिला एक्झिट पोल आला होता. 2018 मध्ये झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत एक्झिट पोलप्रमाणे साधारणपणे कॉंग्रेसची सरशी होईल, असे अंदाज समोर आले होते. राजस्थानमध्ये बदल होऊन चांगल्या बहुमताने कॉंग्रेस जिंकणार, छत्तीसगडमध्ये भाजपा, मध्यप्रदेशमध्ये त्रिशंकू परिस्थिती, तेलंगणमध्ये तेलंगणा राष्ट्रवादी समिती जिंकणार, तसेच मिझोरममध्ये कॉंग्रेस सत्ता गमावणार, असे साधारण एक्झिट पोलचे अंदाज होते. मिझोरम आणि तेलंगणामध्ये हे अंदाज तंतोतंत बरोबर आल्याचे दिसले होते.
यापूर्वीचे एक्झिट पोल बर्‍याच वेळा चुकलेले दिसतात, कारण सॅम्पल काही हजारात घेतले जात असत. यंदा ही संख्या लाखात आहे. देशातील मतदारांची 90 कोटी ही संख्या बघता कमीतकमी एक टक्का म्हटले तरी सॅम्पल 90 लाख मतदार होतात. देशातील सर्व एक्झिट पोलचे सॅम्पल एकत्र केले तरी ते 90 लाखापेक्षा खूपच कमी आहे. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढल्यास एनडीए 300 च्या जवळपास जागा घेऊन सरकार बनवेल, हे स्पष्ट होत आहे. यंदाचे एक्झिट पोलचे सॅम्पल यापूर्वीच्या सॅम्पलपेक्षा खूपच मोठे असल्याने यावेळच्या एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास जाणारे असतील, असे वाटते.
एक्झिट पोल अचूक आले, तर प्रसारमाध्यमे आपली पाठ थोपटून घेतात, अंदाज चुकले तर मात्र मूग गिळून गप्प बसतात. नेमके किती वेळा अंदाज बरोबर आले, किती वेळा चुकले, याबद्दलची माहिती प्रसिद्धिमाध्यमे िंकवा सर्वेक्षण करणार्‍या संस्था प्रकाशित करत नाहीत. एका अंदाजानुसार एक्झिट पोलचे अंदाज सत्तेवर कुठला पक्ष येणार, याचा अंदाज 60 टक्के वेळा बरोबर आणि 40 टक्के वेळा चूक असतो. यंदा मोठ्या सॅम्पलमुळे हा अंदाज जास्त बरोबर येऊ शकेल. 2004 साली भाजपा आघाडीच परत सत्तेवर येणार, असा सर्व महत्त्वाच्या एक्झिट पोल्सचा अंदाज होता, तो पूर्णतः चूक ठरला होता. तसेच दिल्ली विधानसभेत ‘आप’ला एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश येईल, याचा अंदाज कुणालाही करता न आल्याने सर्वच एक्झिट पोल खोटे ठरले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकांसंबंधीचे एक्झिट पोलचे अंदाजसुद्धा 2004 च्या बुश विरुद्ध केरी निवडणुकीत चुकीचे ठरले होते. एक्झिट पोलने प्रेक्षकांची करमणूक, ज्यांच्या बाजूने आहेत त्यांना खुशी व वाहिन्यांची आर्थिक चांदी या गोष्टी घडतात, हे मात्र नाकारता येणार नाही. आता नुकत्याच झालेल्या एक्झिट पोलचे विश्लेषण करू या.
सातही टप्प्यांतील मतदान पूर्ण होताच जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे; तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या जागा 2014 पेक्षा वाढल्या, तरी पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न भंगणार, हे स्पष्ट झाले आहे.
नरेंद्र मोदींची पुन्हा सत्ता येणार का, राहुल-प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कशी कामगिरी करणार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत काय होणार, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पािंठबा देणार का... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या एक्झिट पोलने दिली आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीने भाजपासमोर चांगले आव्हान निर्माण केल्याचे दिसत असले, तरी गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व कायम राहणार असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपाने तृणमूल कॉंग्रेससमोर आव्हान निर्माण केल्याचे एक्झिट पोलमधून समोर येते आहे. यापूर्वीच्या अनुभवानुसार टुडेज चाणक्यचे अंदाज बर्‍यापैकी बरोबर येतात. त्यामुळेच मोदी-शाह म्हणतात त्याप्रमाणे भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवू शकेल एवढ्या जागा मिळवू शकेल, असे वाटते.
खरेतर एक्झिट पोलचा अंदाज पाच टक्यांपेक्षा जास्त चुकणे अपेक्षित नाही. पण, एनडीएला 242 पासून 356 जागा मिळू शकतात, असे एक्झिट पोल सांगत आहेत. पाच टक्क्यांपेक्षा हे फरक खूपच जास्त आहेत. त्यामुळे हे अंदाज बुचकळ्यात टाकणारे आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल मोदी सरकार येणार, असे दर्शवीत असल्याने कॉंग्रेसची एक्झिट नक्की आहे. 23 मे रोजी चित्र स्पष्ट होईलच.
9860613872