धोक्याची घंटा वाजली आहे...!

    दिनांक :22-May-2019
पिण्याचे पाणी 20 रुपये लिटर या भावाने बांदलीबंद करून विकले जाईल, याची कल्पनाही कधी कुणी केली नव्हती. आता हे बाटलीबंद पाणी सर्रास विकले जात आहे आणि त्याची आपल्याला सवय झाली आहे. शुद्ध पाण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरी वॉटर प्युरीफायर लागले आहे आणि शुद्ध हवेसाठी एअर प्युरीफायर्सची गरज आपल्याला पडत आहे. आता आपल्याकडेही हिमालयातली शुद्ध हवा बाटलीबंद करून विकण्याचा उद्योग सुरू झाला आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. ती प्रत्येकाने ऐकायला हवी. न ऐकल्यास परिणाम भोगण्यास तयार राहावे, अशी बिकट परिस्थिती निर्माण होणार, यात शंका नाही. बंद बाटल्यांमधून शुद्ध हवेची विक्री चीनमध्ये सर्वप्रथम सुरू झाली. तिथे आजही बाटलीबंद हवा विकली जाते. चीनमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषणापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी चीनमधील श्रीमंत लोक शुद्ध हवेची बाटली विकत घेत आहेत. प्रदूषणमुक्त हवा बाटलीत बंद करून विकत घेण्याची नामुष्की आम्हीच आमच्यावर ओढवली आहे. आहे की नाही गंमत? जी शुद्ध हवा आपल्याला फुकटात मिळत होती आणि जे शुद्ध पाणी आपल्याला फुकटात मिळत होते, ते आता पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे. फुकटात मिळालेल्या गोष्टीचे मोल नसते म्हणतात, तसे आपले झाले आहे. जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते, तिचे एवढे दोहन करायचे की ती नष्ट झाली पाहिजे.
 
 
 
पर्यावरण आणि निसर्ग हा माणसाच्या जीवन जगण्याचा आधार आहे. मानवी जीवनच यावर पूर्णपणे अवलंबून आहे. निसर्गाशी खेळ करणे कुणालाही परवडणारे नाही, हे गतकाळात उद्‌भवलेल्या मुंबई, श्रीनगर आणि चेन्नईतील पूरपरिस्थितीने सिद्ध केले आहे. हजारो वर्षांपासून निसर्गाने माणसाला आधार दिला आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, अन्नधान्य, भाजीपाला आणि आश्रय निसर्गानेच तर दिला आहे. पण, जो आपला आश्रयदाता आहे, त्याच्याशीच खेळ करण्याची आपली खोड आता आपल्याच जिवावर उठली आहे, हे निश्चित! ज्या नद्यांनी आम्हाला वर्षानुवर्षे पिण्याचे शुद्ध पाणी दिले, शेतीला ओलितासाठी पाणी पुरविले, त्याच नद्या आम्ही प्रदूषित करून टाकल्या. आम्ही आमच्याच वर्तनात विरोधाभास निर्माण केला. एकीकडे आम्ही प्रदूषण वाढविले आणि दुसरीकडे त्याचा त्रास सहन करता यावा यासाठी पैसा खर्च करतो आहोत. पर्यावरणसंरक्षणासाठी परिषदा घेण्याची वेळ आम्हीच आमच्यावर आणली. याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
आम्हाला आर्थिक विकास गतीने हवा आहे. आम्हाला आरामदायी जीवन जगायचे आहे. आम्हाला घरबसल्या सगळ्या सुखसुविधा हव्या आहेत. आम्हाला गाडी चालविताना गुळगुळीत रस्ते हवे आहेत, आम्हाला धुळीशी संबंध नको आहे. आम्हाला गाईचे शेणही अप्रिय झाले आहे. शेणाला हात लावताना ते लवकर लागत नाहीत. हात खराब होतील म्हणून आम्ही शेण आणि माती शरीराला लागू देत नाही. पण, या शेणामातीतच शरीर निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत, याचा विसर आम्हाला पडला आहे. जलद विकासाची आस लागल्याने आणि पंचतारांकित जीवनशैलीची ओढ असल्याने आम्ही ऊर्जेचा अनियंत्रित वापर करत आहोत. नैसर्गिक संसाधने मर्यादित असताना वापर मात्र अमर्यादित केला जात असल्याने, ही संसाधनं कधीतरी संपुष्टात येणार आणि भविष्यकाळ कठीण होणार, हे माहिती असतानाही जाणीवपूर्वक आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. कारण, आम्ही स्वार्थाने आंधळे झालो आहोत. आम्ही आजचा विचार करीत आहोत. पुढच्या पिढ्यांना कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे राहिलेले नाही. नैसर्गिक जलवायू प्रदूषित करण्याचे महापाप आम्ही करत आहोत आणि त्याचे परिणाम आम्ही आताच भोगत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.
पर्यावरणसंरक्षणासाठी सरकारने आवश्यक त्या कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. जे लोक नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नद्यांमध्ये सोडले जाणारे दूषित पाणी रोखले पाहिजे. हे सगळे खरे असले तरी एक दक्ष नागरिक म्हणून आमचीही काही जबाबदारी आहे की नाही? निश्चितच आमचीही जबाबदारी आहे. प्रदूषणाचा पर्यावरणावर ज्याप्रकारे वाईट परिणाम होत आहे, तो लक्षात घेतला तर तातडीने उपाययोजना करणे आवश्यकच आहे. सरकारी पातळीवर प्रयत्न होणे जसे अपेक्षित आणि आवश्यक आहे, तसेच प्रयत्न खाजगी पातळीवर होणेही आवश्यक आहे. असे प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रदूषण निर्माण होईल असे कोणतेही कृत्य मी स्वत: करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही, असा निर्धार आपल्यापैकी प्रत्येकाला करावा लागणार आहे. नुसता निर्धार करून भागायचे नाही, तर त्याला कृतीची जोडही द्यावी लागणार आहे.
गेली दोन वर्षे देशाच्या अनेक भागांत फारच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीसाठीही ओलिताला पाणी उपलब्ध नाही. एकीकडे आम्ही योग्य त्या उपाययोजना न केल्याने कमी पडलेल्या पावसाचेही 40 टक्के पाणी वाया गेले आहे. आमच्या योग्य नियोजनाअभावी कोट्यवधी लोकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, तर काही मोजके लोक पाण्याची प्रचंड उधळपट्‌टी करतात. हे सगळे कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा अनियंत्रित वापर रोखला पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे यांसारख्या प्रभावी उपाययोजना नागरिकांनी स्वत:हून स्वत:वर बंधनकारक करवून घेतल्या पाहिजेत. असे केले तरच भविष्यातील संकटाशी आम्हाला सामना करता येणार आहे.
जी जंगलं आम्हाला शुद्ध हवा देत होती, जी जंगलं आम्हाला विपुल प्रमाणात ऑक्सिजन देत होती, जी जंगलं आम्हाला फळफळावळं देत होती, जी जंगलं आमच्या गावा-शहरातील प्रदूषण रोखत होती, तीच जंगलं आम्ही साफ केली आहेत. जंगलांमध्ये राहणारे प्राणी आज आमच्या वस्त्यांमध्ये घुसून आमच्यावरच हल्ले करीत आहेत. प्राणी हल्ले करताहेत म्हणून आम्ही आरडाओरड करतो आहोत. पण, प्राण्यांच्या वसाहती नष्ट करणारे आम्ही, ही परिस्थिती कुणामुळे ओढवली याचा विचारच करत नाही. जंगलातली माकडं शहरात येतात, घरांमध्ये घुसून अन्नपदार्थ पळवून नेतात, वेळ पडल्यास स्वसंरक्षणासाठी माणसांवर हल्ले करतात. पण, या माकडांनी जंगलांतून शहरात यावे अशी परिस्थिती निर्माण केली कुणी? त्यांना जर जंगलातच अन्नपाणी मिळाले असते, तर ते कशाला शहरांमध्ये आले असते? प्राणिसंरक्षणासाठी काम करणार्‍या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी प्राण्यांची बाजू घेताना फार चांगला आणि प्रभावी युक्तिवाद केला आहे. तुम्हीच प्राण्यांना विस्थापित करणार आणि तुम्हीच त्यांच्याविरुद्ध ओरड करणार, हा कुठला न्याय? पर्यावरणाची हानी जेवढी झाली तेवढी आता पुरे. यापेक्षा जास्त हानी परवडणारी नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती ही मर्यादित आहे आणि मर्यादित साधनांचा वापरही मर्यादितच केला पाहिजे. आम्ही जी जंगलं कापली आहेत, त्यापेक्षा जास्त झाडं लावली पाहिजेत. आज जागतिक हवामानात जे बदल दिसत आहेत, ते भावी संकटांचे संकेत आहेत. हे संकेत ओळखून वागण्यास शिकले पाहिजे... पप