सुबोध भावे झळकणार बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्यासोबत

    दिनांक :22-May-2019
बॉलिवूडमधील कलाकारांना मराठी सिनेइंडस्ट्रीची भुरळ चांगलीच पडली आहे. त्यामुळे कोणी मराठी सिनेमात अभिनय करत आहे तर कोणी मराठी चित्रपटांची निर्मिती. बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही मराठी चित्रपटाने भुरळ पाडली असून लवकरच ते मराठी चित्रपटात झळकणार आहेत. ते 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला.
 

 
 
 
 
'एबी आणि सीडी' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्यासोबत सुबोध भावेदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
 
 
सुबोध भावे याने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. तो म्हणाला की, 'निर्विवादपणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्या बरोबर काम करावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझेही होते आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' चित्रपटात ते साकार झाले. कलाकारांनी कसे असावे, कसे वागावे कसे रहावे आणि कसे काम करावे याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीमचे मनपूर्वक आभार.'
डिजिटल मीडियावर नेहमीच नवनवीन उपक्रम घेऊन येणाऱ्या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत.