अमरावतीचा खासदार कोण होणार?

    दिनांक :22-May-2019
अमरावती, 
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून नेमाणी गोदाम येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे. मतमोजणीच्या अठरा फेऱ्या होणार असून निकाल जाहीर व्हायला जवळपास १० तासांचा अवधी लागणार आहे. निकालाची उत्सूक्ता शिगेला पोहचली असून महायुतीचे आनंदराव अडसुळ, महाआघाडीच्या नवनीत राणा या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लढत काट्याची आहे.
 
 
 
 
निवडणूक 18 एप्रिल रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील 18 लाख 30 हजार 561 मतदारांपैकी 11 लाख 4 हजार 936 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी 60.36 होती. 
 
निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार असून, फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 20 टेबल ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार एकूण 120 टेबलवर उमेदवाराकडून प्रत्येकी एक मोजणी प्रतिनिधी असेल. त्याशिवाय, उमेदवाराकडून पोस्टल बॅलेटसाठी चार व एक निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात एक प्रतिनिधी देता येईल. प्रशासनाकडून या प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहायक व मायक्रो ऑब्झर्व्हर असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
 
ईव्हीएममधील मतांची मतगणनेसोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात पोस्टल पत्रिका व सैन्यदलातील कर्मचाऱ्यांकडून ईटीपीबीएस द्वारे प्राप्त मतांची गणना सुरु करण्यात येईल. ईव्हीएममधील मतांची गणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सोडतीद्वारे पाच मतदान केंद्रे निवडण्यात येतील. या निवड केलेल्या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करून ईव्हीएममध्ये नोंदलेल्या मतांशी पडताळून पाहण्यात येईल. मतमोजणीसाठी एकूण दीडशे पर्यवेक्षक, 160 सहायक व दीडशे मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
 
 
 निवडणुकीतील उमेदवार  पक्ष 
 १)  आनंदराव अडसूळ  महायुती
 २)  नवनीत राणा   महाआघाडी
 ३)  अरूण वानखडे  बसपा
 ४)  विनोद गाडे  अपक्ष 
 ५)  गुणवंत देवपारे  वंचित बहुजन आघाडी
 ६)  नरेंद्र कठाणे  अपक्ष
 ७)  निलिमा भटकर  अपक्ष
 ८)  नीलेश पाटील  अपक्ष  
 ९)  पंचशीला मोहोड  अपक्ष
 १०) संजय आठवले  अपक्ष  
 ११)  अनिल जामनेकर  अपक्ष  
 १२)  अंबादास वानखडे  अपक्ष
 १३)  मीनाक्षी करवाडे   अपक्ष
 १४)  पंकज मेश्राम  अपक्ष  
 १५)  प्रमोद मेश्राम  अपक्ष
 १६)  प्रवीण सरोदे  अपक्ष  
 १७)  राहूल मोहोड    अपक्ष
 १८)  राजू जामनेकर  अपक्ष  
 १९)  राजू मानकर  अपक्ष  
 २०)  विजय विल्हेकर  अपक्ष  
 २१)  विलास थोरात  अपक्ष  
 २२)  श्रीकांत रायबोले  अपक्ष  
 २३)  ज्ञानेश्वर मानकर  अपक्ष  
        एकूण मते -  11 लाख 4 हजार 936