माणसातला देव डॉ. अब्दुल कलाम!

    दिनांक :23-May-2019
घनश्याम आवारी
मित्रांनो, गरिबीमुळे शिक्षण सोडणारे अनेक व्यक्ती आपल्याला माहिती आहेत. परंतु गरिबीचा सामना करत स्वत:चं शिक्षण पूर्ण करणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम! यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामीलनाडूमधील ‘रामेश्वरम्‌’ या गावी एका मुस्लीम परिवारात झाला. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांची आई गृहिणी तर वडील नाविक होते. त्यांचा परिवार मोठा होता आणि पैशांची आवक कमी होती. त्यामुळे दोन वेळेचे निट खायला मिळायचे नाही तर शिक्षण दूरच राहिले. परंतु घरी पैसा नसला तरी उच्च दर्जाचे संस्कार मात्र होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही जाती-पंथाला जास्त महत्त्व दिले नाही.
 
घरातील संस्कार उच्च कोटीचे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीसमोर गेुडघे टेकायचे नाही तर त्याच्याशी दोन हात करून त्या परिस्थितीलाच परास्त करायचे त्यांना माहीती होते. त्यामुळे शिक्षण खर्च आणि घरच्यांना हातभार म्हणून त्यांनी पेपर वाटायला सुरुवात केली. त्याकाळी पेपर रेल्वेने जायचे आणि अब्दुल कलामांचे गाव छोटे असल्यामुळे तिथे रेल्वेचा थांबा नव्हता. त्यामुळे त्यांना रोज पहाटे उठून रेल्वे रुळावर वाट पाहावी लागे आणि चालत्या रेल्वेमधून पेपरचे गठ्‌ठे धावत उतरवावे लागायचे. परंतु परिस्थितीसमोर दुसरा इलाज नसल्यामुळे ते हे काम करायचे. 

 
 
शालेय जीवनात तसे ते एक सामान्य विद्यार्थी होते. परंतु नवीन काही जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या अंगी नेहमी असायची. त्यामुळे ते तासन्‌ तास वाचत बसायचे. मॅट्रिक्युलेशन शाळेतून प्राथमिक शिक्षण ग्रहण केल्यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर 1954 ला भौतिक विज्ञानामध्ये स्नातक पूर्ण केले. त्यानंतर त्यांना ज्या विभागात शिक्षण घ्यायचे होते, त्या विभागात प्रवेश न मिळाल्याने त्यांना खूप दडपण आले. त्यातून स्वत:ला कसेबसे सावरत त्यांनी 1959 ला ‘ऐरोस्पेस इंजिनिअरिंग’मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना 1960 मध्ये डिआरडिओ मध्ये रुजू होण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काही काळातच त्यांनी भारतीय सेनेसाठी एक छोट्या हेलिकॉप्टरची आकृती तयार केली. ज्यामुळे त्यांच्यातील प्रतिभा सर्वांसमोर आली.
 
डिआरडीओमध्ये काम करीत असताना ते ‘इंडियन नॅशनल कमेटी फॉर स्पेस रिसर्च’चे सदस्य सुुद्धा होते. असेच एके दिवशी त्यांना अंतरीक्ष वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि 1969 मध्ये त्यांनी इसरोमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे ते ‘सॅटेलाईट लॉंच व्हेईकल परियोजना’चे निर्देशक म्हणून रूजू झाले. 1979 साली भारताने ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला. त्या कमेटीचे ते सदस्य होते. 70 ते 80 च्या दशकात त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. ते एवढे प्रतिभावान होते की त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कॅबिनेटच्या सल्ल्याशिवाय काही गुप्त संशोधन करण्याची परवानगी दिली होती.
 
त्यांच्याच अध्यक्षतेखाली भारताने ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’ अशा दोन मिसाईल बनविल्यामुळे त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. दुसर्‍या परमाणू प्रशिक्षणात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता. सन 2002 साली त्यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ ग्रहण केली. त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्व त्यांना ‘जनतेचा राष्ट्रपती’ म्हणून संबोधू लागले. आतापर्यंत ते सर्व तरुणांचे लाडके बनले होते. त्यामुळे त्यांना एम टीव्हीने 2003 आणि 2004 चा ‘युथ आयकॉन ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकारचे सुद्धा त्यांना ‘पद्मभूषण,’ ‘पद्मविभूषण’ आणि ‘भारत रत्न’ या पुरस्कारांनी सन्मानित केले.
 
एका गरीब, अशिक्षित नाविकाचा मुलगा जर वैज्ञानिक आणि राष्ट्रपती बनू शकतो तर मग आपण का नाही? हा प्रश्न आज छोट्या छोट्याा गोष्टींत हार माणणार्‍या तरुणांनी स्वत:ला विचारायला हवा आणि डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करायला हवे.