सोशल मीडिया एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

    दिनांक :23-May-2019
सर्वेश फडणवीस
 
आज सोशल मीडियावरून जग अधिक जवळ आले आहे. प्रत्येकजण याचा पूर्णपणे वापर करतो आहे. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिले आहे व आपले विचार आणि त्याचे प्रगटीकरण हे अत्यंत प्रभावी शब्दात मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे.
 
आज या माध्यमातून कुणाच्या खाजगी जीवनावर आपल्याला भाष्य करण्याची मुळात गरजच नाही. प्रत्येकाने त्याचे भान जपण्याची गरज आहे. आज अनेक कडक कायदे या माध्यमातही आहे पण आपण त्या कायद्याना न जुमानता अभिव्यक्त होण्यासाठी कायम तत्पर असतो. कडक कायदे असून सुद्धा गैरकृत्य, शिवीगाळ, अश्लील साहित्य, बदनामीकारक मजकूर कसे आढळून येतात, याबद्दल प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियाची व्याप्ती आता जगभरात पसरलेली आहे आणि कोटी लोक त्याचा वापर करत आहे. 
 
 
 
सोशल मीडिया असो किंवा प्रत्यक्ष जीवन, कुठेही वावरताना स्वातंत्र्य व स्वैराचार यामध्ये आपण फरक करायला शिकलो पाहिजे. दुसर्‍या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात जास्त लक्ष न देता सकारात्मक विचारांवर भर देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. आपण लोकशाही स्वीकारलेल्या देशात राहतो आहे. येथे घटनेला प्राधान्य आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा व विरोधी पक्षांचा अंकुश हा राजसत्तेवर असायला हवाच. त्याने राज्यकर्त्यावर अधिक जबाबदारी येईल आणि ते त्यानुसार आपले कार्य करतील. सत्तेत असणार्‍यांचा विरोध हा मूल्य आणि तत्त्वांवर व्हायला हवा. सत्ताधारी पक्षाची चुकीची व संशयास्पद धोरणं, भ्रष्टाचाराची प्रकरणं, चुकीचे निर्णय यावर प्रसंगी आक्षेपही नोंदविता आलाच पाहिजे.
 
या माध्यमात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचे कौटुंबिक जीवन, त्याचे नातेवाईक यांच्या बद्दल आपण भान ठेऊन बोलले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य आहे, याचा अर्थ असा नव्हे की आपण काहीही बोलून व्यक्त होणे. मान आणि मर्यादा या दोहोंचेही पालन व्हायलाच हवे. तेव्हा ही लोकशाही अधिक बळकट होईल. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जी गळचेपी आणि जे निरर्थक वाद सुरू आहेत ते कुठेतरी आता थांबायलाच हवे.
 
आज या माध्यमात प्रकर्षाने जाणवते म्हणजे आपण सर्व भारतीय काही मुद्यांवर जसे की अनुदान, आरक्षण, पगारवाढ, राजकारण, पक्षांतर्गत मतभेद या आणि अशा अनेक हक्कांसाठी कायम भांडत आहोत. आपली कर्तव्ये आपण कधीच पाळण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान पाळले पाहिजे. आपले विचार आणि त्याचे प्रगटीकरण हे अत्यंत प्रभावी शब्दात मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे. प्रत्येकाने सकारात्मक भाव ठेवत आपले विचार मांडायला हवे. पक्षीय राजकारण आणि व्यक्तिगत आरोप- प्रत्यारोप न करता राष्ट्र निष्ठा अधिक सजग आणि बळकट व उन्नत करण्यासाठी मी सकारात्मक विचार पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असेल हा विचार जागृत करत आपले म्हणणे अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करावा.