राज ठाकरेंच्या सभा फक्त करमणूक ठरल्या !

    दिनांक :23-May-2019
मुंबई : लोकसभा मतदानाच्या आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन मोठ्या प्रमाणात भाजपचा अपप्रचार केला. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत भाजपच्या कामाची तथाकथित पोलखोलही केली. त्यांनी घेतलेल्या सभांना मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला असे चित्र जरी आधी दिसत असले तरी त्यांच्या सभा  निव्वळ करमणूक कार्यक्रम ठरल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या भाजपप्रणित एनडीएला ३३७ जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला ९० जागांवर आघाडी मिळाली आहे. ११५ जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांचा विचार केला तर भाजप २४, शिवसेना २०, राष्ट्रवादी ३ आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे.
 
 
 
राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा काग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा कांग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.