४२ उमेदवारांची अमानत रक्कम जप्त

    दिनांक :24-May-2019
नागपूर:  अनेक लोकांचे राजकारणात उतरण्याचे स्वप्न असते. त्यामुळे काही उमेदवार अपक्ष तर काही लहान पक्षांच्या जागेवर निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि हौशी मौजी खातीर निवडणूक लढविणाऱ्या  उमेदवारांना आपली अनामतही वाचविता येत नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
नागपुरात ३० उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले. काँग्रेसचे उमेदवार वगळता रिंगणातील उर्वरित २८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बसपाचे मोहम्मद जमाल व बहुजन वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनाही आपली अनामत राखता आली नाही. कही अपक्ष उमेदवारांना तर अत्यल्प मते मिळाली आहेत. अनेकांना पाचशेचाही टप्पा गाठता आला नाही.
तर दुसरीकडे रामटेकमुळे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी पुन्हा गड राखला. काँग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे गजभिये वगळता उर्वरित १४ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. बसपाचे सुभाष गजभिये व वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे -पाटणकर यांनाही अनामत वाचविता आली नाही. अनामत जप्त होणे ही राजकारणात नामुष्की मानल्या जाते.