रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरने संपविले जीवन

    दिनांक :24-May-2019
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याच्या अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 
 
टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलचे फेब्रुवारी २०१६ साली सलमान तडवी यांच्या लग्न झाले. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. ते मूळचे भुसावळच्या रावेर येथील आहेत. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. तीन महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.