बसचा प्रवास

    दिनांक :24-May-2019
प्रॉक्सी थॉट 
पल्लवी खताळ-जठार
 
बसमधून जाताना कधी कधी मोठे गमतीदार प्रसंग पाहायला मिळतात. बसमधून प्रवास करताना गर्दी, ढकलाढकली, कंडक्टरबरोबर भांडण हे तर नेहमीचेच प्रकार. सुटे पैसे हा एक वादाचा आणखी प्रकार. पाच किंवा  दहा रुपयांच्या तिकिटासाठी शंभराची नोट काढणारे प्रवासी म्हणजे कंडक्टरसाठी डोकेदुखीच. विशेष करून बसच्या सुरुवातीच्या फेर्‍यांमध्ये असे नोटांचे शतकवीर प्रवासी निघाले की कंडक्टरपुढे प्रश्न पडतो. अनेकदा प्रवाशांजवळ सुटे पैसे असूनही मोठ्या नोटा काढतात. आणि कंडक्टरने सुटे पैसे नाहीत, तिकिटावर लिहून देतो. मग डेपोमधून बाकी पैसे घेऊन जा, असे सुनावले की मग खिशातून किंवा पर्समधून सुटे पैसे बाहेर काढतात. 
 
 
बसमधील प्रवासात भांडणाचा आणखी एक नित्याचा मुद्दा म्हणजे राखीव जागा. बहुतेक सर्वच बसेसमध्ये महिलांसाठी बसची एक संपूर्ण बाजू राखून ठेवलेली असते. पण तरीही उजव्या बाजूच्या सीट्‌सवर महिला बसतात. डावी बाजू रिकामी असली, तरीही का कोण जाणे, पण उजव्या बाजूला महिला सर्रास बसलेल्या दिसतात. बसच्या अगदी सुरुवातीच्या स्टॉपवरसुद्धा बसमध्ये चढलेल्या महिला महिलांसाठी राखीव डावी बाजू सोडून उजव्या बाजूला बसताना दिसतात.
 
कधी कधी डाव्या बाजूल ऊन येते असे कारण सांगतात. क्वचित कधीतरी कंडक्टर महिलांना डाव्या बाजूला बसा म्हणून सांगतो. पण त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. डाव्या बाजूला मात्र एक तर पुरुष प्रवासी सहसा बसणे टाळतात. कारण महिलांसाठी राखीव आहे, असे सांगून एखादी युवतीसुद्धा एखाद्या वयस्क माणसाला उठवताना दिसते. आणि तो बिचारा निमूटपणे उठतो. उलटपक्षी उजव्या बाजूला बसणार्‍या महिलांना डावीकडे बसा, असे सांगण्याचे धाडस सहसा युवकवर्ग तर सोडा, पण ज्येष्ठ नागरिकही करत नाहीत.
 
संस्कृत शिक्षिका,
महाल, नागपूर