तिचा प्रश्न...

    दिनांक :24-May-2019
 रजिया सुलताना
आम्हा महिलांचे वय वाढत जाते, वैचारिक प्रगल्भता येते, आयुष्य स्थिरावते, मुले आपल्या संसाराला लागतात, नातवंडांमधे ती रमते, पण तिचा आतल्या मनाचा आवाज तिला स्वस्थ बसू देत नाही. तो सतत तिच्याशी द्वंद्व करीत असतो. मग तिची स्वत:ची स्वत:वरच आदळआपट होते. कधी तिला स्त्री होण्याचा रागदेखील येतो. तिचे स्त्रीत्व तिच्या लैंगिकतेशी आहे. वयात येताना तिला पाळी येते. पाळीबरोबरच, आता तू तरुण झाली मुली, जरा जपून. मुलांशी संबंध ठेवु नको. ठेवले तर मातृत्व वाट्याला येईल. तो निघून जाईल अन्‌ समाजाचा रोष तुझ्यावरच येईल. तिचे वयात यणे, तिचे शैक्षणिक करीअर आणि विषमलिंगी आकर्षण याची टाय होते आणि ती सगळ्यावर मात करत रजोनिवृत्तीपर्यंत येते.
 
आपल्या समाजात पती हा वयाने मोठा असल्यामुळे तो वयाने आणि विचाराने लवकर म्हातारा होतो. मुले आपला वेगळा संसार मांडतात. ही आपल्या नातवंडांत, भजनी मंडळात, कधी स्वत:च्या छंदात रमते. काही प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नाहीत. मी संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा व्याख्यानाला जाते, प्रसारमाध्यमांत अधिकाधिक लैंगिक साक्षरतेवरच लिहिते. तेव्हा पन्नाशी ओलांडलेल्या अनेक संसारिक महिला मला भेटतात, विविध विषयांवर चर्चा होते. मात्र, हितगुतमधे एक प्रश्न मागील पाच वर्षांपासून निरंतर माझ्यासमोर येत आहे. खूपदा मला असे वाटायचे, आपण एकटेच असा विचार करतो. मात्र, या प्रश्नामध्ये गुंतलेल्या माझ्या असंख्य भगिनी उदासीनतेचे जीवन जगत आहेत. उत्तर मागण्याचे धाडस त्या पतीसमोर करू शकत नाही. शेवटी आयुष्यभर असलेली पुरुषी मक्तेदारी. 
 
 
मागील आठवड्यात एका कार्यक्रमात कौटुंबिक मार्गदर्शन कार्यक्रमाला व्याख्याती म्हणून गेली असताना माझ्या एका मैत्रिणीने मला प्रश्न केला, विवाहानंतर पहिल्या संबंधाची सुरुवात तोच करतो, तोच थांबतो, तोच थकतो. खरंच तिचे समाधान झाले की नाही, याचा अंदाज घेण्याची तसदी तो घेत नाही. आयुष्यात तीन-चार दशके निघून जातात आणि एके दिवशी न सांगताच तो प्रणयनिवृत्ती घेतो. ती आपले जगणे जगत राहते. आपल्या सेक्सुअल आयुष्याचे जेेव्हा ती सिंहावलोकन करते, स्वत:च स्वत:ला प्रश्न करते, आपला शेवटचा शरीरसंबध कधी झाला होता? तेव्हा तिला आठवते, पाच वर्षांपूर्वी, तोही अतृप्त!
 
प्रश्न अतृप्तपणाचा नाही, मात्र आम्हा महिलांनाही भावना असतात. किमान प्रणयनिवृत्ती घेताना- आध्यात्मिक भाषेत संसारिक संन्यास घेताना- पुरुषांनी आपल्या पत्नीशी संवाद केला पाहिजे. जसे पहिल्या सेक्सला आपण आनंदतो, त्याचप्रमाणे शेवटचाही सेलिब्रेट करू शकतो. मनात आणलं तर सगळं होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात भावना, माणुसकी जशी महत्त्वाची आहे तसाच रोमान्सदेखील गरजेचा आहे. अजून किती दिवस यावर पुरुषांची मक्तेदारी राहणार आहे?
 
मूड नाही, कर्जबाजारी, व्यसनाधीनता, डिप्रेशन, ब्लडप्रेशर, शुगर इ. लैंगिक उदासीनतेची अनेक कारणे आहेत. त्यात एक वेगळे कारणही आहे, तेे आध्यात्मिक तत्त्वाशी जोडलेले आहे. खूप झाला संसार, आता अल्लाह अल्लाह करा िंकवा रामनाम जपा. मरण सोपं होईल. अल्लाह को याद करके मरेंगे तो सिधा जन्नत मे जायेंगे! सर्वच क्षेत्रात अंधश्रद्धा आहे, तशी लैंगिक अंधश्रद्धादेखील आहे. संसारसंन्यास घेतला, प्रणयनिवृत्ती घेतली, तर देवाकडे मागितलेल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. कारण आपण मनाने पवित्र झालेलो असतो.
 
पुरुषच प्रणयनिवृत्ती घेतो असे नाही. पन्नाशी ओलांडलेले बरेच पुरुषही आमच्या मानव संवाद केंद्रात येतात. तिचे नातवंडाजवळ झोपणे, देवाच्या नावावर उपवास ठेवणे, गेलेली पाळी म्हणजे प्रणयनिवृत्ती समजणार्‍या महिलादेखील आहेत. पुरुषांचे काय? जेंडरची लढाई इथेही आहे. तो तिच्यावर जबरदस्ती करू शकतो िंकवा आलेच मनात तर विवाहबाह्य संबंधातून तो आनंद मिळवू शकतो. तिचे मात्र तसे नाही.
 
सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक जबाबदारी आणि वाढते वय, या परिघात बायका असतात. ती आपल्या पतीला प्रश्न विचारू शकत नाही की, तुम्ही इतक्या लवकर प्रणयनिवृत्ती का घेतली? हा सगळा सेक्सुअल आयुष्याचा शेवट करताना माझ्याशी संवाद करण्याची तुम्हाला गरज का वाटली नाही? हे प्रश्न घेऊन आज समाजात अनेक महिला जगत आहेत. आतापर्यंत कथा, कादंबर्‍या, बातम्यांमधून सेक्सच्या अतिरेकाबद्दल महिला बोलत आहेत. कारण त्या आनंदावर तिचाही तेवढाच अधिकार आहे. आयुष्याच्या उतारवयात यावरदेखील आता संवाद व्हायलाच हवा.