पिढी अंतराचा सेतू

    दिनांक :24-May-2019
समिधा पाठक
7276583054
 
मम्मा, आज मला यायला उशीर होईल. आज गीताची वीकेंड पार्टी आहे ना संध्याकाळी म्हणून.’’
‘‘काय तुम्हीलोक, नेहमीच काहीतरी वेगळं कारण काढून एकत्र जमता. आमच्या वेळी तर हे कसले प्रकार नव्हते. आम्ही आपलं पै पै जमवून संसार केला आणि तुम्ही मुलं एवढी पैशांची उधळपट्टी करता. तुम्हा मुलांचे सर्व हट्ट तुमचे आई-बाबा पुरवतात ना म्हणून तर तुम्ही डोक्यावर बसले आहात.’’ -इति आजी.
 
‘‘मम्मा, सांग ना यार आजीला. तिच्या वेळी काळ वेगळा होता. प्रत्येक वेळी जेव्हा आमचं काही सेलिब्रेशन असलं की, ही असंच काहीतरी बोलून सगळा मूड ऑफ करते. आणि हो, आजी ऐक, आम्ही आठवड्यात पाच दिवस भरपूर मेहनत करतो आणि वीकेंडला सेलिब्रेट करतो. त्यात काही गैर नाही. माणसाला सोशल व्हावं लागतं आणि डेली रुटीन थोडं बाजूला सारून एक दिवस विरंगुळाही आवश्यक असतो.’’
 
‘‘जाऊ दे ना, तुम्हाला कितीही सांगितले तरी तुम्ही पालथ्या घड्यावर पाणी!’’
 
आजीचे हे शब्द ऐकताच मीरा तिथून रागात निघून गेली. हे चित्र, हे संवाद घराघरांत बघायला व ऐकायला मिळतात. आपल्याला आलेल्या अनुभवातून आधीची पिढी पुढच्या पिढीला सल्ला देऊ पाहते. पुढच्या पिढीला आधीच्या पिढीबद्दल अनादर असतो असं नाही, पण त्यांना त्यांचे सल्ले नको असतात. पुढच्या पिढीच्या मते त्यांचे अनुभव जुन्या काळातले. तेव्हाचा काळ वेगळा होता, विचार वेगळा होता, आताची जीवनशैली वेगळी आहे. त्यामुळे ते सल्ले नवीन पिढीला आवडत नाहीत, योग्य वाटत नाहीत आणि मोठ्यांचं म्हणणं, आम्ही आहोत घरी सल्ला द्यायला तर यांना ऐकायचं नाहीये...
 
आपल्याला आलेल्या अडचणी पुढच्या पिढीला येऊ नयेत, ही चांगलीच भावना असते बर्‍याचदा त्यामागे. त्यांचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी योग्य असेलच असं नाही. आधीची पिढी जेव्हा तरुण असते तेव्हा त्यांनाही त्यांच्या आधीच्या पिढीचा सल्ला फारसा पसंत नसतोच. पण, ही बाब ते विसरतात आणि यामुळे मतभेद होतात, वाद निर्माण होतात, अबोला धरला जातो, भावविवश होऊन दोघेही आपली बाजू मांडून ती कशी बरोबर आहे, हे सिद्ध करतात. मनाने दुबळ्या व भावुक असलेल्या बाजूला हार पत्करावी लागते आणि तडजोडीला सिद्ध व्हावे लागते; आणि या सर्व बाबींचा समावेश एका गोंडस नावाखाली होतो, तो म्हणजे जनरेशन गॅप!
 
 
 
तर मग या रोजच्या तुंबळ युद्धात चूक कुणाची असते? दोन्ही पिढ्या एकमेकांना दोषी धरतात. पण, यात दोघांचाही दोष नसतो. दोष असतो तो वेळेचा आणि परिस्थितीचा. कुठलीही गोष्ट असू द्या ना, प्रत्येक वेळी मतभेद होतातच. मग ते करीअर निवडणे असो, खाण्याच्या पद्धती असो, बोलण्यात, वागण्यात, पोषाखात, संस्कृतीत... या सर्व गोष्टींमध्ये मतभेद होतात. कारण बघण्याचा चष्मा दोन्ही पिढ्यांचा वेगळा असतो. माणूस तीन प्रकारे शिकतो-पहिला प्रकार म्हणजे चारित्र्याच्या प्रतिबिंबाने, दुसरा म्हणजे अनुकरणाने आणि तिसरा प्रकार म्हणजे अनुभवाने. यातील पहिला प्रकार सर्वोत्तम मानला जातो आणि तिसरा प्रकार सर्वात कटू. समाजात मूल वाढतं तेव्हा या तिन्ही प्रकारे कळत नकळत काहीनाकाही शिकत असतेच. त्यामुळे या सर्व गोष्टींचा प्रादुर्भाव त्याच्या मनावर होतो. पालकांनी आपल्या मुलांबरोबर मित्रासारखे राहून त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करायला हवी, निदान महिन्यातून एकदातरी. त्याचे विचार काय आहेत, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याची स्वप्नं काय आहेत, त्याची संगत कशी आहे, हे सर्व त्याच्याशी बोलायला हवे. आपले विचार त्याच्यावर न थोपवता, दोघांच्याही दृष्टीने सोयिस्कर असा सुवर्णमध्य काढायला हवा. पण, या चर्चेत केवळ एकच बाजू भक्कम असून नाही चालायचे, अन्यथा भिडस्त बाजू मनाने खचू शकते.
 
आपल्या मनाजोगे झाले नाही म्हणून मुलं घरी अबोला धरतात, रुसून बसतात, संवाद टाळतात. मग परक्याचा सहारा घेतला जातो किंवा कौन्सिलरचा सहारा घ्यावा लागतो. घरात संवादच नाही राहिला, तर घराला घरपण कसं येईल?
प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला त्या समजणं कठीण असतं. म्हणून आपण पूर्वग्रह बनवायला नकोत. पिढीदरपिढी स्ट्रेस वाढतात, जबाबदार्‍या वाढतात, जीवनशैली बदलते आणि या सगळ्यात कुटुंब व्यवस्थेची व्याख्या मागे पडते. आपल्या व्यग्र जीवनशैलीतून निदान दहा मिनिटेतरी मनमोकळ्या कौटुंबिक संवादाकरिता प्रत्येकाने काढावीत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पाण्याच्या ग्लासचं उदाहरणं आपण जाणतो. पाण्याचा अर्धा ग्लास भरला असला, तरी त्या ग्लासकडे बघण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगळी असू शकते. कुणी म्हणेल की ग्लास अर्धा भरला आहे, तर कुणी म्हणेल ग्लास अर्धा रिकामा आहे. आपण कुणाचा दृष्टिकोन नाही बदलवू शकत.
 
परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. होणार्‍या बदलांना स्वीकारून पुढे वाटचाल करत राहावीच लागते. अहंकार, मानसन्मान बाजूला सारून बघायला हवेत. मोडकळीस आल्या आपुलकीच्या भिंती, आधाराची आता त्यांना गरज आहे. ढासळून गेल्या असतील तरी स्तब्ध आहेत, जुळण्यासाठी मागत आहेत चार शब्द...
 
मी का फोन करू? मी का कमीपणा घेऊ? मी का नमतं घेऊ? मीच का नेहमी समजून घ्यायचं? मी काय कमी आहे का?... असे अनेक मी आयुष्यात विष कालवतात आणि असणार्‍या गॅपला अजून वाढवतात. म्हणून- अरे अति शिकलेल्या माणसा, मीपणा सोड आणि नाती जोड...
एकमेकांचे वेगळेपण स्वीकारून, एकमेकांच्या मतांचा आदर करून सुसंवादाने हा गॅप संकुचित करायला हवा.