समानता

    दिनांक :24-May-2019
सुखदा राहुल एकबोटे 
स्त्री-पुरुष समानता हा विषय समोर आला की, यावर भरभरून बोललं जातं. स्त्रीचा आदर, सन्मान, पुुरुषप्रधान संस्कृतीतून स्त्रीची सुटका, या असंख्य विषयांवर आपणदेखील बरंच चिंतन करू शकतो. पण या चिंतनाचा सार काय? खरंच समाज बदललाय्‌, की स्त्रीची सर्व क्षेत्रांतील पुरुषांसोबतची समानता समाजाने स्वीकारली? यांसारखे अनेक प्रश्न आपल्यापुढे सातत्याने फेर घालतात. अशाच काहीशा समस्या, त्याबद्दलचं चिंतन आपल्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न. घरातील स्त्री शिकली की, संपूर्ण घर सुशिक्षित होते, हे आपण जाणतोच. खरंतर सगळ्यात महत्त्वाचा हाच मुद्दा आपण विचारान्ती पुढे नेऊ या. स्त्री शिक्षणासाठी पुढे आलेले फुले दाम्पत्य आपणांस आठवतात. मुली, स्त्रिया शिकाव्या यासाठी घेतलेले कष्ट, यातना, समाजविरोध या कुठल्याही बाबींचा विचार न करता सतत स्त्री शिक्षणाचा जागर त्यांनी मांडला. 

 
 
या जागराने प्रेरित होऊन अनेक स्त्रिया सुशिक्षित झाल्या आणि होतात. ही जमेची बाजू लक्षात घेत असतानाच दुसरी बाजू समोर येते ती, अजूनही ग्रामीण भागात स्त्रियांच्या शिक्षणासाठी माघार घेतली जाते आणि ही माघार समाजातून नसून ती आपल्या घरातूनच असते, हे वास्तव समोर येते...
काय करायचंय मुलींना शिकून? हा सूरदेखील उमटताना दिसतो. तुमच्या गावात किती मुली आहेत, किती शिकल्या आहेत, असा प्रश्न विचारला असता उत्तर मिळतं, आमच्या गावातल्या मुली शिकत नाहीत, शेतीचे काम करतात, रोजाने शेतात कामाला जातात, मजुरी करतात. आम्ही शिकतोय्‌, कारण आमची मोठी ताई हिमतीने गावाबाहेर पडली आणि शिकायला लागली आणि तिच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्हीही बाहेर पडलो.
 
खरंच मैत्रिणींनो, अशासारखे असंख्य प्रश्न आपल्या मैत्रिणींना भेडसावत असतात. कुठेतरी समाजप्रबोधन करून अशा विषयांवर तोडगा काढणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात शालेय शिक्षणापर्यंतची सुविधा असल्याकारणाने तेथील शिक्षण पूर्ण झालं की, शहराकडे विद्यालयीन शिक्षणासाठी यावं लागतं. शहरात जाऊन प्रवेश घेणे, त्यासाठी लागणारी फी, पैसा, राहण्याची समस्या, वसतिगृहातील प्रवेश िंकवा रोज येणंजाणं करणं... हे विचार करता तेवढे सोपे व सहज नाही. त्यात मुलगी म्हटलं की, घरच्यांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यातही खेड्यात आज ज्याप्रमाणे जागृती होत आहे तेही अभिमानास्पद आहे. मुली स्वत:हून शिक्षणाकरिता शहरात येतात, सर्व प्रक्रिया पूर्ण करतात, शिक्षणातून लाभलेली ऊर्जा, होणारा स्वत:चा विकास, गावातही आपल्या घरच्यांना व इतर मुलींना सांगतात, त्यांनाही प्रेरणा देण्याचे कार्य या मुली वर्तमानात करताना दिसतात... हे देशाच्या प्रगतीचे पाऊलच म्हणावे लागेल.
 
वर मांडलेल्या समस्येचा विचार केला असता असं लक्षात येतं की, मोलमजुरी करणं, शेतात काम करणं, हा अर्थार्जनाचा विषय म्हणून घेतला जातो. अर्थातच पैसा कमवणंही परिस्थितीनुसार गरजेचं असतं. पण, त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं सुशिक्षित होणं असतं.
सुशिक्षित होण्याकरिता शासन अनेक सविधा देऊन मुलींना शिक्षणाची संधी देते. या संधी, सुविधा ग्रामीण भागात पोहोचवून स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी येणार्‍या अडचणी कमी करू या.
कुणा प्रतिभावंतानी म्हटलंय्‌-
‘‘ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू, स्वरांची सुरेल सरस्वती तू;
शब्दांतून जिवंत अशी कविता तू, साहित्याचे जल वाहणारी सरिता तू...’’